देवीदास टेकाळे, कडोंमपा परिवहन व्यवस्थापक
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण, डोंबिवली या दोन महानगरांबरोबरच टिटवाळा, शहाड, आंबिवली, कल्याण तालुक्यातील २७ गावे आदी परिसर येतो. इतक्या विस्तीर्ण प्रदेशात राहणाऱ्या १५ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेची परिवहन व्यवस्था अतिशय अपुरी आहे. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा भरुदड सोसावा लागतो. रिक्षाचालकांवर अवलंबून राहावे लागते. ते सांगतील ते भाडे निमूटपणे देऊन प्रवास करावा लागतो. थोडक्यात एकीकडे स्मार्ट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या शहरांची परिवहन व्यवस्था अतिशय बेभरवशाची आणि अनियमित आहे. अपुऱ्या सेवांबाबत प्रवाशांची ओरड सुरू असून परिवहन प्रकल्प तोटय़ात आहे. परिवहन व्यवस्थेचे हे दुष्टचक्र भेदण्यासाठी प्रशासनाने कोणत्या योजना हाती घेतल्या आहेत, याविषयी व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी साधलेला संवाद..
* परिवहन सेवेची सध्याची स्थिती काय आहे?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम स्थिरस्थावर होण्यासाठी गेली १७ वर्षे संघर्ष करीत आहे. तेव्हापासून आजपर्यंत कधीही हा उपक्रम फायद्यात आलेला नाही. परिवहन स्वतंत्रपणे व्यवस्थित सेवा देऊ शकत नाही. त्यासाठी महापालिकेकडून भरीव तरतुदीची आवश्यकता आहे. सेवा क्षेत्रात स्पर्धा वाढत आहेत. खासगी बस, रिक्षा, टॅक्सी यांच्या सेवा मोठय़ा प्रमाणात असून त्यांच्यासमोर तग धरायचा असेल तर नक्कीच प्रवाशांना योग्य त्या सोयी सुविधा वेळेत दिल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
* परिवहन उपक्रम किती तोटय़ात आहे?
परिवहनकडे बसेसपासून मासिक स्वरूपात वाहतुकीपासूनचे सरासरी दोन कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होते, तर ३ कोटी ३० लाख हा दैनंदिन बसेसवर खर्च आहे. महापालिकेकडून परिवहनला ७० लाख रुपये मिळतात. त्याचाच अर्थ परिवहनला महिन्याला ५५ लाखांचा तोटा होतो.
* गतिमान प्रवासी सेवा देण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
सद्य:स्थितीत परिवहनच्या ताफ्यात रस्त्यावर प्रत्यक्ष धावणाऱ्या १०० बसेस आहेत. लवकरच जवाहरलाल नेहरूनागरी पुनरुत्थान योजनेतील मंजूर १८५ बसेसपैकी ७० बसेस प्राप्त होतील. परिवहनच्या बसेस शहरातील विविध ४२ मार्गावर प्रवासी फेऱ्या देत आहेत. नवीन बस आल्यावर ५६ मार्गावर परिवहन सेवा देण्यात येईल. या नवीन मार्गामध्ये पालिकेत नव्याने सामील झालेल्या ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा तसेच शहरातील मुख्य रस्ते व गृहसंकुले ज्या ठिकाणी निर्माण झाली आहेत, त्या मार्गाचा समावेश आहे. बसेसची संख्या वाढल्याने जिथे अध्र्या तासाला बस येत होत्या. तिथे आता दहा मिनिटांच्या अंतरावर या बसेस प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. जर तुमच्या दारातच तुम्हाला बसची सोय मिळाली तर नक्कीच त्याचा वापर तुम्ही कराल. यामुळे परिवहनच्या उत्पन्नातही वाढ होईल व त्या पद्धतीने सोयीसुविधा प्रवाशांना देणेही शक्य होईल. येत्या चार ते पाच महिन्यात ही सेवा सुरूहोईल.
* पूर्वीच्या बसेस वारंवार नादुरुस्त होतात. याविषयी प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांना नाइलाजाने इतर वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. असे का होते?
पालिकेकडे आता बसेसची संख्या गरजेपुरती आहे. नवीन बस परिवहनच्या ताफ्यात सामील झाल्या असल्याने साहजिकच या तक्रारी कमी होतील. शिवाय आगारातील बस उभ्याउभ्या खराब होऊ नये म्हणून आलटून पालटून बस आगारातून काढल्या जातील व त्या चालविल्या जातील. त्यामुळे आता बस नादुरुस्त होण्याच्या तक्रारी कमी होतील. नागरिकांनी निर्धास्तपणे प्रवास करावा.
* नवीन बस डेपोच्या पेट्रोल पंपाचे काम कुठपर्यंत आले आहे?
बस डेपोविषयी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर विषय मांडला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपाच्या कामास सुरुवात झाली असून, कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथे पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे.
* परिवहनकडे नवीन बस आल्या तरी बसचालक नाहीत, ही तूट कशी भरून काढणार आहात? त्यांना वेतनही वेळेवर मिळत नाही, अशी स्थिती आहे, त्याविषयी काय?
परिवहनकडे सध्या ६७५ कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित आवश्यक कर्मचारी उपलब्धतेबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. कमीतकमी ५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही, परंतु परिवहनच तोटा सहन करत असल्याने त्यांना वेळेवर पगार देणे शक्य होत नाही.
* भावी उपाययोजना काय आहेत?
सर्व सोयीसुविधांनी युक्त डेपो तयार करणे, नवीन मार्गावर बसेसची वाहतूक सुरळीत सुरूकरणे, त्यातून उत्पन्न वाढीला मदत होईल. कमीतकमी खर्चात जी कामे होतील ती पूर्ण करण्याकडे परिवहनचा कल आहे. उपक्रमाच्या आरक्षित ८ पैकी ३ ते ४ भूखंडांच्या विकासाला गती, गणेशघाट आगारामध्ये सी.सी.टी.व्ही., प्रवासी भाडय़ाचे सुसूत्रीकरण, भांडार विभाग व कार्यशाळेतून संगणक कार्यप्रणालीचा वापर आदी सुधारणांना वाव देण्याचा मानस आहे.

lowest water stock in Mumbai lakes
मुंबईच्या पाणीसाठयात दिवसेंदिवस घट; जलसाठा २२.६१ टक्क्यांवर, कपातीबाबत पालिकेची चालढकल 
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती