कल्याण, डोंबिवलीतील नोकरदारांची व्यथा; गाडय़ांना विलंब, वाहतूक कोंडीमुळे हैराण

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : लोकलसेवा बंद असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील नोकरदार वर्ग राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मुंबई ठाण्यातील कार्यालय गाठत आहेत. या बस प्रवासासाठी दररोज शंभर ते दीडशे रुपये भाडे मोजूनही या नोकरदारांची कामावर पोहोचताना दमछाक होत आहे. गणेशोत्सवासाठी एसटी गाडय़ा कोकणाच्या दिशेने सोडल्या जात असल्याने कल्याण ते मुंबई मार्गावरील बससेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गाडय़ा उशिराने उपलब्ध होत असून रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दररोज कामावर पोहोचण्यास विलंब होत आहे.

कल्याण, डोंबिवली परिसरातून दररोज लोकलने सुमारे पाच ते सहा लाख नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने प्रवास करतो. करोनामुळे लोकल सेवा बंद असल्याने नोकरदारांना एसटी बसेस हा सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. सध्या कल्याण-डोंबिवलीतून बसने ठाण्याला जाण्यासाठी दररोजचे ७० रुपये लागतात. तर, मुंबईहून दररोजच्या परतीच्या प्रवासाचा हाच खर्च १५० रुपये इतका आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाच्या महिन्याच्या प्रवासाच्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच एका घरातील दोन ते तीन व्यक्ती कामासाठी असल्यामुळे महिन्याचा हा खर्च १० हजारांहून अधिक होत आहे.

दुसरीकडे, या बसगाडय़ांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रवाशांची खूपच धावपळ होते. डोंबिवली आगारातील बसची वेळ सहाची असेल तर किमान पाऊण तास अगोदर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात दररोज ठाणे, मुंबईत जाणाऱ्या खासगी आस्थापना कर्मचाऱ्यांच्या मोठय़ा रांगा लागलेल्या असतात. तर बस वेळेच्या अर्धा ते पाऊण तास उशिरा येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवासाला वैतागलेले खासगी कर्मचारी लोकलमधून प्रवास करावा म्हणून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात शिरण्याचा प्रयत्न करतात. पण तेथील सुरक्षा जवान त्यांना अडवतात.

एसटी कोकणात

गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे एस.टी. महामंडळातील अनेक बस गणेशभक्तांना घेऊन कोकणात गेल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वी बस आगारात किंवा थांब्यावर १५ ते २० मिनिटांनी येणारी बस आता एक ते दोन तास उशिरा येत आहेत. याबाबत आगारात चौकशी केल्यावर अनेक बस कोकणात  गेल्या आहेत, असे उत्तर मिळते.

डोंबिवलीतून दादर येथील कार्यालयात जायचे होते. बाजीप्रभू चौकात सकाळी सात वाजता रांगेत उभे राहिलो. रांगेत अनेक प्रवासी असल्याने सकाळी ११ वाजता बससाठी क्रमांक लागला. अकरा वाजता बसचा डोंबिवलीतून प्रवास सुरू झाल्यानंतर शिळफाटा येथील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बस दुपारी दोन वाजता दादर येथे पोहचली. डोंबिवली ते दादर प्रवासासाठी तब्बल सात तास लागले. हा अनुभव नेहमी घेत असतो. 

– सचिन गंभिरे, नोकरदार, डोंबिवली

मी ठाण्यातील माजिवडा येथे नोकरीला आहे. सकाळी आठ वाजता कामावर हजर होणे बंधनकारक आहे. सकाळी सहा वाजता बाजीप्रभू चौकात बस पकडतो. शिळफाटा, मुंब्रा वळण रस्ता आणि ठाण्यातील कोंडीतून मार्ग काढत बस ठाण्यात खोपट येथे पोहचते. तेथून कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी रिक्षेशिवाय पर्याय नाही. वेळेवर न येणाऱ्या बस आणि कोंडीमुळे सर्वच प्रवासी हैराण झाले आहेत. 

– प्रवीण कदम, नोकरदार, डोंबिवली

खासगी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाला मुभा नाही. त्यामुळे एस.टी.वर त्यांना अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा बस एक ते दीड तास येत नाहीत. आपला डोंबिवली-मानखुर्द प्रवास अडीच ते तीन तासात होतो. मुंबई, शिळफाटय़ावरील वाहतूक कोंडीतून सुटका झाली मग सुटकेचा नि:श्वास सोडतो.

– श्रीकांत खुपेरकर, रहिवासी. डोंबिवली बस आगाराजवळ एसटीसाठी लागलेली प्रवाशांची रांग.