रेल्वे स्थानक परिसरात ठिय्या; ठाण्यातील फेरीवाले आल्याची चर्चा
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून जोरदार हालचाली सुरूकेल्या होत्या. मात्र, वरिष्ठांसह स्थानिक प्रभाग अधिकारी, फेरीवाला हटाव पथके पूर्णपणे थंडावली असल्याने, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर या भागातील स्कायवॉक पूर्णपणे फेरीवाल्यांनी गजबजून गेले आहेत. ठाणे परिसरातील हटविण्यात आलेले फेरीवाले मोठय़ा संख्येने शहरात आल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांना हटविण्याची कामगिरी काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर सोपवली, तर फेरीवाले हटविण्याचे काम प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा ठेऊन फेरीवाला हटाव पथकातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाकडून करण्यात आल्या. सुरुवातीचे काही दिवस या बदली कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटविण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु, आता प्रामाणिकपणाचा आव आणून फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी थेट फेरीवाल्यांशी संधान बांधून त्यांची पाठराखण करीत असल्याचे दृश्य कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात दिसत आहे.
कल्याण रेल्वे स्थानक भागातील स्कायवॉक चारही बाजूने फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. स्कायवॉकवरून चालणे प्रवाशांना अवघड होत आहे. फेरीवाला हटाव पथकाची वाहने स्कायवॉक खालून फेरीवाल्यांना हटविण्याचा दिखावा करीत आहेत. परंतु, हे कर्मचारी स्कायवॉकवरील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. कल्याणमधील एक जागरूक नागरिक अरविंद बुधकर यांनी रेल्वे स्टेशन मास्तरना भेटून रेल्वेच्या हद्दीतील फेरीवाले तरी किमान हटवा म्हणून मागणी केली, त्यावेळी त्यांनी ती जागा पालिकेची आहे, असे सांगून कारवाई करण्याचे टाळले.
शहरात कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य सेवा मिळत नसेल तर आयुक्त स्वत: त्या ठिकाणची पाहणी करून आदेश देत असत. आता आयुक्तांकडून या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने सामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. काही माफिया, समाजकंटक या फेरीवाल्यांकडून लाखो रुपये दर महिन्याला गोळा करीत असल्याचे चर्चेतून समजते.
फेरीवाल्यांच्या नेत्यांशी ‘हस्तांदोलन’
मागील दोन महिने पालिका कर्मचारी मालमत्ता कर वसुलीच्या कामात गुंतले असल्याने, त्यांचे फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत होते. आता कर वसुलीच्या कामातून मुक्त होऊनही कर्मचारी कार्यालयात बसून फेरीवाल्यांची मजा आणि घरी जाताना फेरीवाल्यांच्या नेत्यांशी ‘हस्तांदोलन’ करीत असल्याची चर्चा आहे.
फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अ. भा. भ्रष्टाचारनिर्मूलन समितीचे महेश निंबाळकर यांच्यातर्फे आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्याशी संपर्क साधला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात बाजीराव अहिर हे कर्मचारी चार वर्ष फेरीवाला हटाव पथकात कार्यरत होते. तोपर्यंत एकही फेरीवाला रेल्वे स्थानक भागात दिसत नव्हता. परंतु, त्यांची तीन महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेत बदली झाली. तेव्हापासून पश्चिम डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजून गेला आहे. डोंबिवली पूर्व भागातील रामनगर वाहतूक पोलीस, लक्ष्मी रुग्णालय रस्ता, पाटकर रस्ता, उर्सेकरवाडी, इंदिरा चौक, राजाजी रस्ता हा परिसर फेरीवाल्यांनी गजबजून गेलेला असतो. हाकेच्या अंतरावर ग प्रभाग कार्यालय आहे. परंतु, या प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी कार्यालयाबाहेरच पडत नसल्याने फेरीवाले राजरोस या रस्त्यांवर बसलेले दिसतात. फडके रस्ता, नेहरू रस्ता या भागात फेरीवाले हटविण्याची कारवाई फ प्रभागाकडून सतत सुरू असल्याने फेरीवाले ग प्रभागातील मुख्य रस्त्यावर, स्कायवॉकवर दिसत आहेत. स्थानिक ग प्रभाग अधिकारी, फेरीवाला हटाव पथक प्रमुख यांचेकामाकडे लक्ष नसल्याने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.