शहरात एक ते दीड तास रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याच्या तक्रारी

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये एक ते दीड तास रांगा लावूनही करोनाची लस मिळत नसल्याचे चित्र आहे. कोविन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी होत नसून त्याचबरोबर नोंदणीनंतरही सात दिवसांनी लसीकरणासाठी बोलविले जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारांना कंटाळून कल्याण-डोंबिवलीकरांनी आता लसीकरणासाठी मुंबईकडे धाव घेतली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात पालिका तसेच खासगी अशा एकूण १२ केंद्रांवर करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र, येथील नियोजन गोंधळाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. याबाबत डोंबिवलीतील सारस्वत वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिक दुर्गेश कामत यांनी व्यथा मांडली आहे. पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी दररोज मोठी रांग असते. या रुग्णालयात दिवसाआड सव्‍‌र्हर डाऊन असतो. त्यामुळे नोंदणीसाठी आलेल्या लाभार्थीना दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितले जाते. खासगी रुग्णालयात अनेक जण पैसे देऊन लस घेण्यासाठी जातात. मात्र नोंदणी केल्यानंतर सात दिवसांनी लसीकरणासाठी या, अशी उत्तरे दिली जातात, असे त्यांनी सांगितले.  या प्रकाराला कंटाळून पंधराशे ते सोळाशे रुपये खर्चून खासगी वाहनाने मुंबईतील बीकेसीमध्ये जाऊन लस घेतली. तसेच एका शेजाऱ्याने ठाणे पालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस घेतली, असे त्यांनी सांगितले.

बीकेसीमध्ये लसीकरण

डोंबिवलीतील लसीकरण केंद्रांवर अनेक वेळा फेऱ्या मारल्या; पण अनेक अडचणी आल्या. त्यामुळे मुंबईतील बीकेसी येथे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस अगोदर नोंदणीकरण करून तिसऱ्या दिवशी कुटुंबातील पाच सदस्य बीकेसी येथे खासगी वाहनाने गेलो. तिथे लसीकरणाची खूप उत्तम व्यवस्था मुंबई पालिकेने केली आहे. लसीकरणाची २० केंद्रे एकाच ठिकाणी आहेत, असे डोंबिवली पूर्वेतील सारस्वत कॉलनीमधील किशोर कामत यांनी सांगितले.

पालिका म्हणते, योग्य नियोजन

कल्याण-डोंबिवलीमध्ये लसीकरणाची १२ केंद्रे असून या ठिकाणी योग्य नियोजन करून लसीकरण केले जात आहे. पालिकेला जेवढा लसीचा साठा उपलब्ध होतो, तो सम प्रमाणात पालिकेसह खासगी रुग्णालयांना दर आठवडय़ाला वाटप केला जातो. काही तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीकरणाचा सव्‍‌र्हर बंद होऊ शकतो. मात्र, असे नेहमी होत नाही. अधिकाधिक लसीकरण केंद्र सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.