कल्याण-डोंबिवलीतील नदी, नाले आणि खाडीचे पाणी धोकादायक

 शहरातील औद्योगिक कंपन्यांवर बंदीची महापालिकेवर नामुष्की

कल्याण-डोंबिवली शहरांतील नदी आणि नाल्यांच्या प्रदूषणाची पातळी कमालीची वाढल्याने शहरातील ४० औद्योगिक कंपन्या बंद करण्याची नामुष्की शहरावर उद्भवली. वनशक्ती या संघटनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत हरित लवादाने शहरातील औद्योगिक कंपन्यांवर कारवाईची कुऱ्हाड उगारली. यथावकाश या कंपन्यांना पुन्हा उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाली. बंदी असली अथवा नसली तरी शहरातील नाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनांची तीव्रता मात्र ‘जैसे थे’ स्वरूपाची आहे. त्यामुळे केवळ नाल्याच्या बाजूच्या रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांनासुद्धा रसायनांच्या वासाने भोवळ येईल इतकी घातक परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. जलप्रदूषणांची तीव्रता या दोन्ही शहरांना सारखीच भेडसावत असून नाल्यातील, नदीतील आणि खाडीतील पाण्याने प्रदूषणाच्या कमाल मर्यादाही ओलांडल्या असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील औद्योगिक क्षेत्रातून निघणारे सांडपाणी जलशुद्धीकरण प्रक्रियेशिवाय थेट नाले आणि खाडीमध्ये सोडले जात असून शहरातील जलप्रदूषणाचा हा सगळ्यात मोठा स्रोत आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबरच घरगुती सांडपाणी आणि मलनिस्सारण सांडपाणीही अपुऱ्या प्रक्रिया व्यवस्थेमुळे थेट नदीत सोडले जात आहे. शहरामध्ये सुमारे ३१० किमी मलनिस्सारण वाहिन्यांच्या जाळ्यांची अवश्यकता असून १७ मलनिस्सारण सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याची गरज आहे.

शहरविकास आराखडय़ामध्ये याचा समावेश असला तरी नवीन जलशुद्धीकरण केंद्राची वानवा शहराला भेडसावत आहेत. शहरामध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरामध्ये भल्या मोठय़ा नाल्यांची निर्मिती केली असली तरी जलशुद्धीकरणाच्या आ     घाडीवर मात्र पुरती निराशाच दिसून येत आहे.

खाडीच्या पाण्याचा दर्जा घसरला

कल्याणची खाडी ही उल्हास नदीचे मुख असून या नदीला लागून कल्याण-डोंबिवली, एमआयडीसी क्षेत्र, उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ शहरातील प्रदूषित रसायने या खाडीत येत असून त्याचा फटका कल्याण-डोंबिवलीला बसतो. महापालिकेच्या वतीने खाडीच्या पाण्याचा दर्जा तपासण्यात आला असता खाडीच्या पाण्याचा दर्जा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या परिमाणांपेक्षा निकृष्ट असल्याचे दिसून येते.

खारफुटींची कत्तल

कल्याण खाडीकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात खारफुटीची आणि तिवरांची जंगले असून रेतीमाफिया आणि विकासकांच्या अतिक्रमणामुळे खारफुटीचे अपरिमित नुकसान केले जात आहे. झोपडपट्टय़ांची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि कचऱ्याचे साम्राज्य यामुळे ही हानी होत आहे. तर वाळूमाफियांनी केलेल्या खारफुटीच्या कत्तलीमुळे शहरातील इमारतींनाही धोका निर्माण होऊ लागला आहे.