News Flash

६५०० कोटींची घोषणा खोटीच!

गेल्या दोन वर्षांत या पॅकेजमधील फुटकी कवडीही शहरांच्या वाटय़ाला आलेली नाही.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका (संग्रहित छायाचित्र)

दोन वर्षांनंतरही कल्याण-डोंबिवलीकरांना पॅकेजची प्रतीक्षा; भाजपला विस्मरण

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी डोंबिवलीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहरांच्या सर्वागीण विकासासाठी ६हजार ५०० कोटीचे पॅकेजची घोषणा केली होती. येत्या ३ ऑक्टोबरला या घोषणेला दोन वर्षे झाली, मात्र कल्याण-डोंबिवलीकरांच्या पदरात काहीच पडलेले नाही. उलट हे आकडे पालिकेने शासनाला पाठवलेल्या विकास आराखडय़ातील होते, असे सांगून भाजपचे स्थानिक नेते सारवासारव करत आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ३ ऑक्टोबर २०१५ रोजी डोंबिवली जिमखान्याच्या मैदानावर ‘भाजप विकास परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मोठय़ा आवेशपूर्ण भाषणातून कल्याण, डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ६ हजार ५०० कोटीचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या स्वप्नाला भुलून कल्याण-डोंबिवलीकरांनी पालिका निवडणुकीत भाजपला भरभरून साथ दिली व भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढही झाली.

परंतु, गेल्या दोन वर्षांत या पॅकेजमधील फुटकी कवडीही शहरांच्या वाटय़ाला आलेली नाही. शहरातील सध्याची उकिरडय़ाची परिस्थिती पाहता भाजपने आमच्या तोंडाला पाने पुसल्याची रहिवाशांची भावना झाली आहे.

पालिका हद्दीत २७ गावे समाविष्ट केल्यानंतर, पालिकेचा सर्वागीण विकास कसा करता येईल यासाठी शासनाने कसा निधी देणे आवश्यक आहे, याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी विकासकामांबाबत एक अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्या अहवालात विकासाची आकडेवारी होती.

तीच आकडेवारी विकास परिषदेच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वाचण्यात आली, असा दावा भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत.

राज्य सरकारची परिस्थिती नाजूक आहे; त्या परिस्थितीमधून आपण कडोंमपासाठी मलनि:सारण, २७ गाव पाणी योजनेसाठी निधी आणला. क्षेपणभूमीसाठी राज्य सरकारने भरीव मदत केली आहे. केंद्र, राज्य शासनाकडून उपलब्ध होईल त्याप्रमाणे निधी आणून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पॅकेजची पूर्तता करण्यात येईल. 

– नरेंद्र पवार, आमदार, कल्याण

६५०० कोटीच्यापॅकेजचे स्वप्न

* रेल्वे स्थानक परिसर सुधारणेसाठी ३०० कोटी

* पाणीपुरवठा योजना ३५० कोटी

* रस्ते सुधारणा १८२२ कोटी

* जल-मलनि:स्सारण ९४६ कोटी

* घनकचरा ३३४

* गरिबांसाठी घरे १००० कोटी

* आपत्ती २४ कोटी

* आरोग्य १५०० कोटी

* ई गव्हर्नन्स ६ कोटी

* प्रदूषण नियंत्रण १७२ कोटी

* ३५० एकर उद्यानांचा विकास

आणि वस्तुस्थिती..

* कडोंमपाचा २० सप्टेंबर २०१६ रोजी केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश.

* शहरात या योजनेंतर्गत २८ विकासाचे प्रकल्प राबविले जाणार.

*  ७०० सीसीटीव्ही ६८३ ठिकाणी कायमस्वरूपी व काही अग्निशमन, पोलिसांच्या

वाहनांवर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

*  आतापर्यंत केंद्राच्या अमृत योजनेतून १५३ कोटी मलनि:सारणासाठी, १८० कोटी २७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे १०० कोटी असा एकूण सुमारे ४३३ कोटीचा निधी आला आहे.

* स्मार्ट सिटी प्रकल्पातून कडोंमपाला एकूण दरवर्षी एक हजार याप्रमाणे केंद्राकडून ५०० कोटी, राज्याकडून २५० व कडोंमपाचे २५० कोटी असा एकूण पाच वर्षांत पाच हजार कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे.

* रेल्वे स्थानक विकासाचा टप्पा प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. यासाठी ४२७ कोटी प्रस्तावित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2017 3:20 am

Web Title: kalyan dombivli waiting for 6500 crore package announced by cm
टॅग : Kdmc
Next Stories
1 केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा
2 भाईंदरमधील पालिका शाळांचा कायापालट
3 चिखलोली स्थानक आणखी ५ वर्षे नाहीच
Just Now!
X