|| भगवान मंडलिक

भारतीय दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाकडून मानांकन; हागणदारीमुक्तीत मोलाची कामगिरी :- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी, वर्दळीचे रस्ते, शाळा आणि पाणवठय़ाच्या किनारी भागातील स्वच्छतागृहे ही उत्तम दर्जाची आहेत. डोंबिवली दत्तनगर-संगीतावाडीमधील स्वच्छतागृह हे सर्वोत्तम असून रेल्वे स्थानक भागातही उत्तम दर्जाच्या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहेत. भारतीय दक्षता आणि गुणनियंत्रण पथकाच्या पाहणी अहवालातून हे समोर आले आहे.

याशिवाय, शाळांमधील स्वच्छतागृह व्यवस्थापनाकडून स्वच्छ ठेवली जात असून शहर हागणदारी मुक्त करण्यात प्रशासन महत्त्वाची कामगिरी बजावत आहे, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या गुणनियंत्रण पथकाने पालिका आरोग्य विभागाला हागणदारी मुक्तीचे (ओपन डिफेक्शन फ्री) मानांकन दिले आहे.

या महापालिका हद्दीत ४५० हून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. केंद्र शासनाने स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटींच्या निधीतून बाराशे स्वच्छतागृह बांधण्याचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी सुमारे ८०० हून अधिक स्वच्छतागृह महापालिकेने विविध भागांत बांधली आहेत. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी दुमजली स्वच्छतागृहेही बांधली आहेत.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाच्या पथकाने नुकतीच महापालिका क्षेत्रातील स्वच्छता, मलप्रक्रिया केंद्र आणि कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागातील ४९ ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली होती.

रयत सुभेदारवाडा शाळा, वाणी विद्यालय, मेरेडिअन शाळा, बीटी गायकवाड शाळा येथील स्वच्छतागृहे स्वच्छ असल्याचे पथकाला पाहणीदरम्यान आढळून आले आहे. पालिका अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवून शहर हागणदारी मुक्त करण्यात मोलाची कामगिरी केली आहे, अशी प्रशंसा पथकाने केली आहे. आधारवाडी, बारावे, टिटवाळा येथील मलप्रक्रिया केंद्र योग्यरीतीने चालविली जात असल्याचे पथकाने म्हटले आहे.

शहराच्या विविध भागांतील स्वच्छतागृहे खासगी संस्थांना चालविण्यासाठी दिली तर त्यांचा दर्जा चांगला राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर नागरिकांना चांगली सुविधा मिळेल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वजनिक स्वच्छतागृहे म्हणजे दरुगधीचे आगर असे म्हटले जाते. मात्र, हा कलंक पुसून टाकण्यास साहाय्य होईल, असे पथकातील सदस्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सूचित केले.

सर्वोत्तम स्वच्छतागृह

डोंबिवलीतील संगीतावाडी दत्तनगर चौकातील स्वच्छतागृहाला सर्वोत्तम देखभालीचे गुणांकन देण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी उभारलेल्या ई स्वच्छतागृहाला उत्तम गुणांकन मिळाले आहे.

आधारवाडी तुरुंग रस्ता, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील, टिटवाळा गणपती मंदिराशेजारील, टिटवाळा थारवानी वसाहत, मोहने आयडीआय कंपनीजवळील, पिसवली जयभीम नगर झोपडपट्टी, डोंबिवली गांधी रस्त्यावरील, लोढा हेवन गजाजन मार्केट येथील स्वच्छतागृहांना उत्तम दर्जा देण्यात आला आहे.