ठाणे, कल्याण-डोंबिवलीत करोनाबाधितांच्या संख्येत घट

ठाणे : जिल्ह्यात करोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असून गेल्या काही महिन्यांपासून करोनाचे केंद्र असलेल्या कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातील दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी साडेचारशेहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहरात शंभरहून कमी, तर चारशेहून अधिक रुग्णसंख्या पडणाऱ्या ठाणे शहरात सध्या दीडशेहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. या दोन्ही शहरांपाठोपाठ जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १४ हजार ३८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ लाख ७९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६६ टक्के आहे, तर ३.८२ टक्के म्हणजेच ८ हजार १८२ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५ हजार ४०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यूचा दर २.५२ टक्के आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात दररोज सतराशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून सातशेपेक्षाही कमी रुग्ण आढळून येत आहेत. तसेच करोना संसर्गाचे केंद्र बनलेल्या ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

महिनाभरापूर्वी ठाणे शहरात दररोज चारशेहून अधिक करोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहरात संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. आता दररोज दीडशेहूनही कमी रुग्ण आढळून येत आहेत, तर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या कल्याण-डोंबिवली शहरामधील संसर्गही घटल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी साडेचारशेहून अधिक रुग्ण आढणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत सध्या शंभरहूनही कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या शहरांमधील आरोग्य यंत्रणांवर येणारा ताणही कमी झाला आहे.

इतर शहरांच्या रुग्णसंख्येतही घट

जिल्ह्यातील नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि अंबरनाथ या शहरांमध्येही दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांत दीडशेहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. तर, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि अंबरनाथमध्ये दररोज ५० हून कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे करोना रुग्णालयांतील खाटा रिकाम्या असल्याचे चित्र आहे.