‘न्यू शेपर्ड’ यानाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान

कल्याण : मूळच्या कल्याण पूर्व कोळसेवाडीतील आणि अमेरिकेत शिक्षण व नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या संजल गावंडे या तरुणीने ‘न्यू शेपर्ड’ या अंतराळ यानाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यान उभारणीतील १० जणांच्या चमूत तंत्रज्ञ म्हणून तिचा सहभाग आहे.

संजलचे उच्च शिक्षण अमेरिकेतील मिशिगन, शिकागो व कॅलिफोर्निया येथील विद्यापीठांमध्ये पूर्ण झाले आहे. ‘एअरोस्पेस’ हा तिच्या आवडीचा विषय. ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ‘ब्ल्यू ओरिजिन’ या एअरोस्पेस कंपनीने ‘न्यू शेपर्ड’ हे यान विकसित केले आहे. येत्या मंगळवारी जेफ बेझोस यांच्या उपस्थितीत या यानाची उड्डाणपूर्व जमिनीवरची चाचणी घेण्यात येणार आहे.

संजलचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कल्याणमधील मॉडेल इंग्लिश स्कूल, बिर्ला महाविद्यालय, वाशीतील फादर अ‍ॅग्नेल महाविद्यालय येथे झाले. ती मुंबई विद्यापीठाच्या २०११ च्या तुकडीची ‘मेकॅनिकल इंजिनीअर’ आहे. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायची तिची इच्छा होती. अमेरिकेतील ‘मिशिगन टेक’ विद्यापीठात ‘मास्टर ऑफ सायन्स’चा अभ्यासक्रम तिने प्रथम श्रेणीत पूर्ण केला. विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेक येथील मक्र्युरी मरीन कंपनीत तिने पहिल्या नोकरीस सुरुवात केली. मात्र अवकाशात झेप घ्यायचे स्वप्न असल्याने सुट्टीच्या दिवशी ती विमान प्रशिक्षण घ्यायची. जून २०१६ मध्ये संजलला वैमानिकाचा परवानाही मिळाला. कॅलिफोर्नियातील ऑरेंज सिटी येथील ‘टोयाटा रेसिंग डेव्हलपमेंट’ या कंपनीत तिने मेकॅनिकल डिझाईन इंजिनीअर म्हणून काम सुरू केले. शर्यतीच्या गाड्यांच्या इंजिनचे अभिकल्प करण्याचे काम तिच्याकडे होते. सॉफ्टवेअर, हार्डवेअर तंत्रकौशल्यात संजल पारंगत असल्याने ब्ल्यू ओरिजिन कंपनीने ‘न्यू शेपर्ड’ अंतराळ यान विकसित करण्याच्या पथकात तिची निवड केली. या यानाचे रॉकेट अभिकल्प तयार करण्याच्या १० जणांच्या पथकात तिने काम केले.

‘शालेय जीवनापासून तिने जे स्वप्न उराशी बाळगले होते ते कठोर मेहनतीने पूर्ण केले,’ असे तिची आई सुरेखा यांनी सांगितले. संजलचे वडील अशोक कल्याण डोंबिवली पालिकेतील निवृत्त कर्मचारी आहेत, तर आई ‘एमटीएनएल’च्या निवृत्त कर्मचारी आहेत. संजलचे पती विदेशात वैमानिक आहेत.