सहा वर्षांपासून काम खोळंबलेले; परवानगीअभावी रेल्वे पुलाला स्कायवॉकची जोडणी लांबली

कल्याण पूर्वेतील स्कायवॉक उभारणींमध्ये अनेक अडथळे येत असल्याने तो खोळंबला आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेचा स्कायवॉक पुढील महिनाभरात सुरू करण्याचे महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांचे आदेश त्यामुळे हवेत विरून जाणार आहेत. कल्याण पूर्वेतील स्कायवॉकला लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा राहिला नसल्यामुळे स्कायवॉकचे काम लांबणीवर पडून येथील लाखो प्रवाशांना चिखल, माती, रेल्वे रूळ ओलांडत, अंधाऱ्या बोगद्यातून चालण्याचा त्रास आणखी काही काळ सहन करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा वर्षांपासून या स्कायवॉकचे काम खोळंबलेले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दृष्टीने दुर्लक्षित भाग असलेल्या कल्याण पूर्वेतील स्कायवॉकच्या कामामध्ये सतराशे विघ्न येत आहेत. कल्याण पूर्वेत जाण्याचा रस्ता रेल्वे यार्डातून जात असून या मार्गावर अनेक समस्यांचे अडथळे आहेत. सम्राट अशोकनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना चक्क रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

या भागात मालगाडय़ांचा मोठा राबता असून या गाडय़ा तासन्तास रस्ता अडवून थांबून असतात. त्यामुळे तेथून बाहेर पडणे प्रवाशांना शक्य होत नाही. काही प्रवासी थेट मालगाडय़ांच्या खालून रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालतात. येथील नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन या भागात स्कॉयवॉक उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. २००८ साली या स्कायवॉकला परवानगी मिळाल्यानंतर या स्कायवॉकच्या आराखडय़ात अनेक बदल करण्यात आले. सहा वर्षांपासून रखडलेले काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून मोठय़ा जोमात सुरू झाले होते. महापालिका आयुक्तांनी या कामाची पाहणी करून पुढील महिनाभरात हा स्कायवॉक सुरू करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र येथील तिकीट खिडकीच्या कामाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप झाले.

महापालिका प्रशासनाने त्यात तथ्य असल्याचे दिसल्यानंतर पुन्हा नव्याने काम करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले. मात्र त्यानंतर ठेकेदाराचे कर्मचारी काम सोडून गेल्यामुळे येथील सर्व साहित्य ‘जैसे थे’ पडून आहे. तर रेल्वेपुलाला स्कायवॉक जोडण्यासाठी रेल्वेने परवानगी दिली नसल्यामुळे हे काम पडून आहे. त्यामुळे स्कायवॉकचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  उ

रेल्वे पुलाच्या पायऱ्या तोडून तेथून हा पूल स्कायवॉकला जोडला जाईल. मात्र त्याला रेल्वेची परवानगी मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. तसेच तिकीट खिडकीच्या इमारतीचा काही भाग निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो भाग तोडून नव्याने बांधण्यात येत आहे. ठेकेदाराचे कर्मचारी येत नसल्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम केले जाईल. त्यामुळे हे काम थांबले आहे. मात्र पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण होईल.

– प्रमोद कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका