पार्किंगच्या वादातून हुक्का पार्लर मालक आणि त्याच्या साथीदाराने रिक्षाचालकाची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री कल्याणमध्ये घडली. रियाझ शबिर शेख असे या रिक्षाचालकाचे नाव असून घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत.

रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारा रियाझ शबिर शेख हा कल्याण पूर्वेतील श्रीकृष्ण नगर येथे राहायचा. त्याच्या घराच्या बाजूला हुक्का पार्लर आहे. साजिद नामक तरुण या हुक्का पार्लरचा मालक असल्याचे समजते. हुक्का पार्लरमध्ये येणारी लोकं रियाझच्या घरासमोर गाड्या पार्क करायचे. रियाझचा या पार्किंगला विरोध होता. शुक्रवारी रात्री रियाझच्या घरासमोर पुन्हा गाड्या पार्क केल्या होत्या. यामुळे रियाझ संतापला आणि त्याने थेट हुक्का पार्लरकडे धाव घेतली. हुक्का पार्लरचा मालक साजिदशी त्याचा वाद झाला. या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देऊन सोडून दिले होते.

शनिवारी रात्री पुन्हा रियाझ आणि साजिद यांच्यात पार्किंगवरुन वाद झाला. साजिदने फोन करुन त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी रियाझवर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या रियाझला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळतात त्यांनी हुक्का पार्लरमध्ये तोडफोड केली. घटनेनंतर साजिद व त्याचे साथीदार पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध आहेत. पोलिसांनी शुक्रवारीच साजिदवर कारवाई केली असती तर रियाझचा जीव वाचला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.