कल्याणमध्ये वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर जमावाने हल्ला केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. केतन बेटावदकर हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात राहणाऱ्या रोहित भोईर (वय २२) या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने  त्याला कल्याण पश्चिमेतील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहित भोईरचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप होता. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोडही केली. या घटनेच्या वार्तांकनासाठी कल्याणमधील काही पत्रकार रुग्णालयात गेले. या दरम्यान रुग्णालयाच्या आवारात जमलेल्या जमावाने बेटावदकर यांच्यावरही हल्ला केला. या मारहाणीत केतन बेटावदकर गंभीर जखमी झाले. केतन बेटावदकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. केतन बेटावदकर हे स्थानिक न्यूजवेबसाईचे संपादक आहेत.