कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचा वरचष्मा स्पष्ट

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे पक्षाच्या वर्चस्वाच्या जोरावर विजयी होतील, हा अंदाज होताच. मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शिंदे यांनी आघाडी घेतली. शिंदे यांच्या मतांची आघाडी तोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना एकदाही यश आले नाही. प्रत्येक मतदान यंत्रातून शिंदे यांच्या पारडय़ात पडणारी मते जणू वाहत होती. त्यामुळेच या मतदारसंघातील निकाल येण्यास रात्र झाली तरी दुपारी साडेतीन वाजताच एक लाख ९७ हजार ४९५ मतांची आघाडी घेत शिंदे यांनी विजयाच्या दिशेने कूच केले होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे बाबाजी शिंदे आणि तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडाऊ मत मिळविण्याच्या शर्यतीत होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बाबाजी यांनी ७८ हजार ४०९ मते, हेडाऊ यांनी ३५ हजार ५५४ मते मिळविली होती. शिंदे यांनी दोन लाख ७५ हजार ९०४ मते मिळवली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार आहेत. या बहुतांशी उमेदवारांना ५० ते ३०० या दरम्यान मते मिळाली. त्यापेक्षा ‘नोटा’चा आकडा निश्चितच जास्त होता. मात्र, शिंदे यांच्या आघाडीचीच चर्चा दिवसभर होती.

सकाळी साडेनऊनंतर विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मतदान यंत्रे उघडण्यात आली. त्याप्रमाणे युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मतांची आकडेवारी दोन हजार मतांनी वाढू लागली. हा आकडा उत्तरोत्तर तीन ते चार हजारांनी वाढून प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना मागे पाडू लागला. दुपारी चार वाजेपर्यंत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीन लाख सात हजार ४४६ मते मिळवली. बाबाजी पाटील यांनी ८४ हजार २८५ मते मिळवली. हेडाऊ यांना ३९ हजार ८५ मते मिळाली. या फेरीत नोटाचा सात हजार १७२ मतदारांनी वापर केला. साडेचार वाजेपर्यंत आठव्या फेरीत शिंदे यांनी एक लाख ४० हजार मतांची आघाडी घेतली होती. नवव्या फेरीपर्यंत शिंदे यांनी एक लाख ५९ हजारांची आघाडी घेऊन दोन लाख २५ हजार ९१२ मते मिळवली होती.