कल्याणहून सुटलेली गाडी पकडल्याबद्दल मारहाण

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांतील पुरुष प्रवाशांमध्ये लोकल गाडीत चढण्या- उतरण्या- बसण्यावरून होणारे वाद नेहमीचेच झाले असतानाच, आता महिला डब्यातही वादाचे असे प्रसंग हाणामारीत रूपांतरित होऊ लागले आहेत. कल्याणहून सुटलेल्या सकाळी ८.३६ च्या लोकलमध्ये चढल्याचा जाब विचारत कल्याणमधील चार महिला प्रवाशांनी कल्याणमधूनच चढलेल्या डोंबिवलीतील एका महिलेस मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.

कल्याण-डोंबिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सकाळी मोठी गर्दी असते. अनेक लोकल कल्याणहून सुटत असल्याने डोंबिवलीतील प्रवासी उलट दिशेने कल्याणला जाऊन तेथून लोकल पकडत असतात. यावरून मूळच्या कल्याणच्या प्रवाशांसोबत त्यांचे वादही होतात. अशीच घटना बुधवारी सकाळी घडली. डोंबिवलीतील टिळकनगर भागात राहणाऱ्या चारुमती वेल्हाळ यांनी बुधवारी सकाळी डोंबिवलीहून कल्याणमध्ये जाऊन कल्याणहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सुटणारी सकाळी ८.३६ ची लोकल पकडली. त्या वेळी कल्याणमधून प्रवास करणाऱ्या चार ते पाच तरुणींनी येथून का प्रवास करता असा जाब विचारून त्यांना बसलेल्या आसनावरून उठण्यास सांगितले. मात्र चारुमती यांनी माझ्याकडे कल्याण ते सीएसएमटीचा मासिक पास असल्याने मी उतरणार नाही असे त्या तरुणींना सांगितले. यानंतर त्या तरुणींनी चारुमती यांना मारहाण व शिवीगाळ केली. चारुमती यांनी पूर्ण प्रवास करून सीएसएमटीला उतरून या पाच महिलांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली.