News Flash

व्यापारी संपामुळे कल्याणकर वेठीस

विक्रेत्यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता होते.

व्यापाऱ्यांच्या संपामुळे कल्याणमधील लक्ष्मी मार्केटमध्ये बुधवारी सर्व व्यवहार बंद होते. (छायाचित्र: दीपक जोशी)

महापालिकेच्या सशर्त परवानगीनंतर माघार; कल्याण आणि परिसरातील किरकोळ विक्रेत्यांचे हाल
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या फेरीवाला हटाव मोहिमेला विरोध करीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लगतच असलेल्या बेकायदा बाजारातील व्यापाऱ्यांनी बुधवारी संपाचे हत्यार उगारल्याने कल्याण तसेच आसपासच्या परिसरातील कृषी मालाच्या पुरवठय़ावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. महापालिकेने व्यापार करण्यास सशर्त परवानगी देताच हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दरम्यानच्या काळात व्यापार बंद राहिल्याने ग्राहकांचे मोठे हाल झाले.
कल्याणचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या शिवाजी चौकातील लक्ष्मी मार्केट येथे किरकोळ, घाऊक फळ-भाजी विक्रेत्यांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विक्रेत्यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता होते. विक्रेत्यांच्या या मुद्दय़ांना आक्षेप घेत महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी फळ-भाजी विक्रेत्यांविरोधात कडक भूमिका घेत लक्ष्मी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीच्या गाडय़ांवर र्निबध आणले. याविरोधात भाजी विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत बंदचे आंदोलन सुरू केले. या संपाची फारशी कल्पना नसल्याने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, दत्त जयंती अशा धार्मिक महत्त्व असणाऱ्या दिवसांच्या तोंडावर हा बंद उसळल्याने सार्वजनिक मंडळे तसेच रहिवाशांची तारांबळ उडाली. तसेच किरकोळ बाजारातील भाज्यांच्या पुरवठय़ावरही विपरीत परिणाम झाला. याचा फटका आसपासच्या शहरांमधील किरकोळ बाजारांनाही संपाचा फटका बसला.
संपाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कल्याणातील घाऊक, किरकोळ फळ-भाजी विक्रेत्यांमध्ये बुधवारी बैठक झाली. सर्वप्रथम महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याबरोबर व्यापाऱ्यांची चर्चा झाली. यामध्ये महापौर देवळेकर यांनी कडक भूमिका घेत, भाजीच्या गाडय़ांवर नियंत्रण आणि स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष देण्यास व्यापारी वर्गाला बजावले. त्यानंतर आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी झालेल्या चर्चेत फळ-भाजी विक्रेत्यांच्या भाजीच्या गाडय़ा सोडण्यास महापालिकेने सशर्त परवानगी दिली. येत्या १ महिनाभर या अटींचे पालन होत असेल तरच हा निर्णय कायम केला जाईल. अन्यथा कायमस्वरूपी या विक्रेत्यांच्या व्यवसायावर र्निबध आणले जातील, असा सक्त इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. येत्या मंगळवारी लक्ष्मी मार्केट बंद ठेवून पालिकेमार्फत त्याची साफसफाई केली जाणार आहे.

काय आहेत या अटी?
* भाजीच्या गाडय़ा येण्यास रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी.
* केवळ छोटय़ा भाजीच्या गाडय़ांनाच आतमध्ये येण्यास परवानगी.
* लक्ष्मी मार्केटमधील संपूर्ण स्वच्छता व्यापाऱ्यांनीच राखावी.
* मार्केटच्या प्रत्येक गेटवर कचऱ्याचे डबे ठेवणे अनिवार्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 4:18 am

Web Title: kalyan people in critical condition because businessman strike
Next Stories
1 केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांची महिलांशी अरेरावी
2 नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांकडून १०० टन कचरा संकलित
3 कलाविष्कार सोहळ्यात शिक्षकांचा स्नेहमेळा
Just Now!
X