18 October 2019

News Flash

राजकीय टिप्पणीतून धार्मिक भावना दुखावल्या; ‘टिटवाळ्याचा महाराजा’ अ‍ॅडमिनला नोटीस

...तर पोस्ट करणाऱ्याबरोबरच अ‍ॅडमिनवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल

अ‍ॅडमीनला नोटीस

तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राजकीय चर्चा रंगत असतील आणि त्यामध्ये टोकाची भूमिका घेऊन राजकीय पक्षांवर किंवा एकमेकांवर टीका केली जात असेल तर वेळीच सावध व्हा. कल्याण तालुका पोलिसांनी अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर होणारी टीका आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टसाठी अ‍ॅडमीनला नोटीस पाठवली आहे. तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या पोस्टमुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्याबरोबरच अ‍ॅडमीनवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.

कल्याण पोलिसांनी ‘टिटवाळ्याचा महाराजा’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्टसंदर्भात नोटीस पाठवली आहे. तुमच्या ग्रुपमध्ये कोणाला अ‍ॅड करावे कोणाला नाही याचे अधिकार तुम्हाला आहेत. तसेच या ग्रुपमध्ये कोणकोणते संदेश येतात किंवा पाठविले जातात याबद्दल तुम्हाला पूर्ण कल्पना असते असं पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.

‘सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांवर किंवा वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते. या टीकेबरोबरच धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप तसेच इतर सोशल मिडियावरुन मोठ्या प्रमाणात पाठवल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तुमच्या ग्रुपमध्येही अशाप्रकारची टीका करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा पोस्टमुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ज्या व्यक्तीने सदरची पोस्ट केली आहे त्या व्यक्तीसहीत ग्रुप अ‍ॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरुन तुमच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये राजकीय पक्ष किंवा वैयक्तिक टीका तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करु नयेत. यासंदर्भातील सूचना तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील सर्व सदस्यांना द्याव्यात अशी सूचनाही या ग्रुप अ‍ॅडमिनला करण्यात आली आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजसमुळे काही गुन्हा दाखल झाल्यास ही नोटीस न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

९ ऑक्टोबर रोजी कल्याण तालुका पोलीस स्थानकातील निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या नावाने पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. ‘टिटवाळ्याचा महाराजा’ नावाच्या ग्रुपला पोलिसांनी ही नोटीस पाठवली असली तरी हा ग्रुप खरोखरच गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आहे की नाही याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. या ग्रुप अ‍ॅडमिनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

First Published on October 10, 2019 4:37 pm

Web Title: kalyan police sent a notice to whatsapp admin over religious sentiments hurt scsg 91