वाहतूक शाखेची कल्याणमध्ये कडक मोहीम
कल्याण शहरातील रिक्षाचालकांची वाढती मुजोरी मोडून काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उशिरा का होईना कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसाला बदडले होते. या मारहाण प्रकरणामुळे या मुजोरीचा अनुभव पोलिसांनाही आला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वाहतूक पोलिसांनी गेल्या सात दिवसांत तब्बल १०६० रिक्षाचालकांविरोधात विविध कलमा अंतर्गत कारवाई केली आहे.
२९ नोव्हेंबर रोजी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक पोलीस हवालदाराला मुजोर रिक्षाचालकाकडून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवसापासून पोलिसांनी
मुजोर रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. कल्याणातील दीपक हॉटेल, झुंजारराव मार्केट, बस स्थानक (रेल्वे स्थानक परिसर), वल्लीपीर चौक, शिवाजी चौक अशा विविध परिसरांत मुजोर रिक्षाचालकांना बडगा देण्यास सुरुवात केली. गणवेश न घालणे, चौथी सीट बसवणे, बॅच न लावणे, परवाना जवळ न बाळगणे अशा विविध नियमांचे उल्लघंन केलेल्या १०६० रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाहतूक विभागाच्या मोहिमेमुळे बहुतांशी रिक्षाचालक वठणीवर आले आहेत. त्यांपैकी काही रिक्षाचालकांनी पोलिसांचा धाक लक्षात घेत रिक्षा चालविताना घालावयाचा गणवेशही परिधान करण्यास सुरुवात केली आहे.
– विजय शिंदे, पोलीस निरीक्षक, कल्याण वाहतूक.