रिक्षा प्रवाशांची परवड थांबवण्यासाठी कल्याण शहरात प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय उप्रादेशिक परिवहन विभाग आणि रिक्षा संघटनेने संयुक्तरित्या घेतला आहे. ठाण्यातील प्रीपेड रिक्षा सेवेचा प्रयोग यशस्वी झाल्याने कल्याणमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. डोंबिवलीतही प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
कल्याण मधील प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ रविवार ३१ मे रोजी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक, रिक्षा संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. शासन पातळीवर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे कल्याण मधील प्रवाशांना या सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यायचा विचार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, आरटीओ अधिकारी नंदकुमार नाईक यांनी केला. रिक्षा प्रवासाचे किलोमीटर दरासाठी ‘आरटीओ’कडून सर्वेक्षण करण्यात आले. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळून ही सेवा देण्यात येणार आहे, असे ‘आरटीओ’ अधिकारी नंदकुमार नाईक यांनी सांगितले. ही सेवा पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी रिक्षा चालक, संघटना सर्वोतपरी प्रयत्न करतील, असे प्रकाश पेणकर यांनी सांगितले.
प्रीपेड रिक्षेचे दर
कल्याण पश्चिमेत दोन किलोमीटरच्या टप्प्यात रिक्षेला नऊ थांबे आहेत. या थांब्यामध्ये रहेजा कॉम्पलेक्स, दूधनाका, बेतुरकरपाडा, संपदा रूग्णालय, सिंडीगेट, प्रेम ऑटो आदी टप्पे आहेत. या टप्प्यासाठी दिवसा प्रवाशांकडून ३५ रूपये, तर रात्री ४२ रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. दोन किमीच्या पुढील ४ किलोमीटर पर्यंत दिवसा ६५ रूपये, रात्री ७९ रूपये आकारण्यात येणार आहेत. ४ किमीच्या या टप्प्यात नेतिवली, योगीधाम, दुर्गाडी, बारावे, आरटीओ, आधारवाडी, श्री कॉम्पलेक्स, वसंत व्हॅली, माधव संकल्प, मोहन पार्क, गगनगिरी, वायलेनगर, बिर्ला महाविद्यालय परिसराचा समावेश आहे. ४ किमी ते ६ किमीच्या प्रवासासाठी दिवसा ९५, रात्रीच्या वेळेत ११८ रूपये भाडे आकारण्यात येणार आहे.