01 October 2020

News Flash

बांधकाम विभागात रोजचेच हेलपाटे! 

अधिकारी वर्गाची भेट घेण्यासाठी दररोज येऊन चौकशी करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

 

 

दूरध्वनी बेकायदा असल्याने कल्याणमध्ये नागरिकांची गैरसोय

कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना येथील अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. कार्यालयाशी संबंधित कामानिमित्त संपर्क साधायचा असल्यास येथे एक दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. परंतु या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो अवैध क्रमांक असल्याचे उत्तर मिळते. विशेष म्हणजे, याविषयी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता आमचा दूरध्वनी सुरू असल्याचे मोघम उत्तर देऊन नागरिकांची बोळवण केली जाते.

कल्याण पश्चिमेला शासकीय विश्रामगृह इमारतीच्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून कल्याण तालुक्याचे कामकाज केले जाते. ही कामे मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांच्या माध्यमातून चालतात. त्यामुळे येथे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ठेकेदारांचा राबता जास्त असतो. शासकीय इमारतींचे बांधकाम, रस्ते, पूल यांचे निर्माण, देखरेख, आपत्ती काळात तातडीच्या उपाययोजना करणे, रस्त्याच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण हटविणे, सार्वजनिक वापराच्या इमारतींना आवश्यक ते प्रमाणपत्र देणे यांसारखी कामे या विभागाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक कामानिमित्त येथील कार्यालयात येतात. कार्यालयात संपर्क साधण्यासाठी सकाळी ९.३० ते ५.३० अशी कार्यालयीन वेळ तसेच ०२५१ – २३१३४७७ हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला असून सर्व अधिकाऱ्यांसाठी हा एकच क्रमांक आहे.

रोज येऊन चौकशी करा

अधिकारी वर्गाची भेट घेण्यासाठी दररोज येऊन चौकशी करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. येथील कर्मचाऱ्यांना अधिकारी कुठे गेले आहेत याविषयी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहिती नसते. ते दिवसभरात येतील का नाही, याचीही त्यांना माहिती नसते. तसेच अधिकारी वर्गाशी संपर्क साधायचा झाल्यास काय करावे, असे त्यांना विचारले तर रोज येऊन चौकशी करा, असे अजब उत्तर दिले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2017 12:22 am

Web Title: kalyan public works department
Next Stories
1 प्रचाराच्या गोंगाटाला भिवंडीत पायबंद
2 ठाण्यातील कळव्यात माथेरानचा अनुभव; बच्चेकंपनीसाठी ‘टॉयट्रेन’
3 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध
Just Now!
X