कल्याण स्थानकातील कर्जतकडील रेल्वे पुलाचा रॅम्प (उतार) गेल्या आठवडय़ामध्ये कोसळला. या कोसळलेल्या भागाची केवळ मलमपट्टी करून रेल्वे प्रशासनाने हा विषयच संपवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामुळे मोठय़ा अपघाताची शक्यता निर्माण झाली असून अनावश्यक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स सरकते जिन्यांची उभारणी केली जात असताना आवश्यकता असलेल्या ठिकाणी मात्र किरकोळ दुरुस्तीची मलमपट्टी लावल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. कल्याण स्थानकातील आयुर्मान संपलेल्या पुलांची डागडुजी करण्याऐवजी त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन हे पूल नव्याने बांधण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
कल्याण स्थानकामध्ये चार रेल्वे पूल असून पाच वर्षांपूर्वी एका नव्या रेल्वे पुलाची स्थानकामध्ये बांधणी करण्यात आली. नव्या पुलावर सर्वाधिक गर्दीचा लोंढा असला तरी अन्य तीन पुलांवरही दररोज मोठी गर्दी उसळते. स्थानकात जुने तीन पुल असून ते १८५० च्या दशकातील आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही. देखभाल दुरुस्ती म्हटली की रेल्वे पुलांना रंगरंगोटी करून त्याची दुरुस्ती केल्याची मलमपट्टी केली जात होती. जीर्ण झालेल्या या पुलांचे बांधकाम ढासळू लागले असून याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. प्रवासी संख्या वाढत गेल्याने या पुलांवर दिवसाच्या कोणत्याही वेळी गर्दीचा लोंढा कायम असतो.
काही वेळा पुलाला हादरे बसत असल्याचा अनुभवही प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. याविषयी रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे प्रवासी संघटना वारंवार तक्रारी करत असताना रेल्वेकडून याकडे डोळेझाकच करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ामध्ये या तीन रेल्वे पुलांपैकी कर्जतकडील पुलाच्या रॅम्पचा भाग कोसळल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या डागडुजीचा मार्ग अवलंबला असल्याने यावर प्रवासी संघटनांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.
ठाणे स्थानकात सरकते जिने, वातानुकूलित स्वच्छतागृह आणि लिफ्टची व्यवस्था केली जात असताना कल्याणला सापत्न वागणूक दिली जात असून पुलांच्या प्रश्नाकडेही लक्ष दिले जात नाही, असे प्रवासी संघटनांचा आरोप आहे.    
लोखंडी खांबाचा आधार..
कोसळलेल्या पुलाचा भाग दुरुस्त करण्याऐवजी त्याला लोखंडी खांबाचा टेकू दिला गेला असून त्यामुळे हा भाग धोकादायक बनला आहे. शिवाय पूर्वीची चालण्याची जागा कमी झाली आहे. या भागातून चालताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. पूल कोसळल्यानंतर या भागातील प्रवाशांचा प्रवेश थांबवल्यामुळे या पुलाला पूर्णपणे सुरक्षित करण्यात येईल, अशी प्रवाशांची अपेक्षा असताना या पुलाला लोखंडी टेकू लावून हा प्रश्न निकाली लावला आहे. कल्याण स्थानकात पहिल्यांदा रेल्वे धावली त्या काळात उभारण्यात आलेले पूल आणि स्थानक जैसे थे असेच आहे. आवश्यकतेनुसार केवळ त्यांचा विस्तार करण्यात आला आहे. मूळ स्थानक आहे तसेच आहे. स्थानकातील पुलांच्या मजबुतीकरणासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने पूल ढासळू लागले आहेत. त्यामुळे मलमपट्टी करण्यापेक्षा नव्या पुलाची गरज आहे, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे राजेश घनघाव यांनी केली आहे.