२० हजार लोकांना सामावून घेणाऱ्या ‘निर्वातालयम’चा प्रकल्प आंतरराष्ट्रीय परिषदेत

पृथ्वी नष्ट झाली तर काय, हा मानवाला प्राचीन काळापासून पडलेला प्रश्न. त्या त्या काळातील विज्ञान, संशोधनाच्या मदतीने मानवाने त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही केला आहे. असाच एक प्रयत्न कल्याणमधील एका बारावीच्या विद्यार्थ्यांने केला असून त्याच्या या प्रकल्पाची निवड आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेसाठी झाली आहे. ऋषिक आनंद चंद्रचूड या विद्यार्थ्यांने २० हजार लोकांचे ‘घर’ बनू शकेल, अशा अवकाशयानाचा आराखडा प्रकल्प तयार केला असून अमेरिकेत जूनमध्ये होणाऱ्या परिषदेत या प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे.

ऋषिकने या अवकाशयानाला ‘निर्वातालयम’ असे नाव दिले असून अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे होणाऱ्या परिषदेत जगातील नामांकित संशोधकांसमोर त्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल स्पेस सोसायटी’ या संस्थेतर्फे दरवर्षी ‘स्पेस सेटलमेंट’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत ऋषिकच्या प्रकल्पाची निवड झाली आहे.

भविष्यात नैसर्गिक कारणांमुळे पृथ्वी नष्ट होण्याची भीती अवकाश अभ्यासकांनी वर्तवली आहे. या पाश्र्वभूमीवर किमान २० हजार माणसे राहू शकतील, अशा ‘निर्वातालयम’ या अवकाशयानाचा प्रकल्प ऋषिकने तयार केला आहे. अवकाशातील निर्वात पोकळीतही भक्कमपणे आश्रय देऊ शकेल असे हे यान असल्याचा ऋषिकचा दावा आहे.

कल्याण येथील मुथा महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ऋषिकने  तीन महिन्यांपूर्वी स्पेस सेटलमेंट स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्या या प्रकल्पाची निवड झाल्याचे नुकतेच त्याला ‘नॅशनल स्पेस सोसायटी’कडून कळवण्यात आले आहे. या संस्थेकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत जगभरातील अवकाश संशोधन क्षेत्रातील दिग्गज मंडळी सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे वेगळय़ा कल्पना घेऊन प्रकल्प बनवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परिषदेत स्थान देण्यात येते.

‘स्पेस सेटलमेंट’ स्पर्धेविषयी..

अवकाश संशोधनाला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संस्था ‘नासा’तर्फे १९९४ ते २०१८ या कालावधीत ‘स्पेस सेटलमेंट’ ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येत होती. यंदापासून ‘नॅशनल स्पेस सोसायटी’ या स्पर्धेचे आयोजन करत आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी राज्यातून एकाची तर भारतातून चौघांची निवड झाली होती.

पुढील काळात मला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करायचे आहे. त्या क्षेत्रातील पदवी संपादन करायची आहे. परदेशात अधिक अभ्यास करून पुन्हा भारतात येऊन भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात कार्य करायचे आहे.

– ऋषिक चंद्रचूड

ऋषिकचा खूप अभिमान वाटतो. प्रत्येक पालकाने त्यांच्या पाल्याला प्रोत्साहन द्यायला हवे. त्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करायला हवे.

– वैशाली चंद्रचूड, ऋषिकची आई