लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या वास्तूची दुरवस्था झाली आहे. रुग्ण उपचार घेत असलेल्या खोल्यांमधील छताचा गिलावा जमिनीवर कोसळत आहे. पावसाचे पाणी झिरपल्याने अनेक ठिकाणी भिंतीं ओल्या झाल्या आहेत. या सर्वाचा त्रास रुग्ण, परिचारिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांना होत आहे. याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, करोनाकाळात यंत्रणा व्यस्त असल्याने रुग्णालय दुरुस्तीचे काम थांबले होते. मात्र, आता हे काम पुन्हा सुरू झाले आहे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात अस्वच्छता असते. पावसाच्या पाण्यामुळे रुग्णालयातील अनेक खोल्यांच्या छतांना ओलावा आला असून त्यामुळे प्लॅस्टर अचानकपणे जमिनीवर पडत आहे. हा गिलावा  रुग्णाच्या अंगावर पडून त्यांना इजा होण्याची भीती आहे. तसेच या छताचा तुकडा अंगावर पडेल, अशी भीती डॉक्टर आणि परिचारिका यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेचा अर्थसंकल्प २१०० कोटींचा असताना प्रशासनाला रुक्मिणीबाई रुग्णालय सुसज्ज करता आलेले नाही. शासनाने ही रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी केली होती. त्यालाही पालिकेने होकार कळविलेला नाही. ही रुग्णालये शासनाच्या ताब्यात गेली तर नगरसेवकांना नातेवाईक, रुग्ण मतदारांना या शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करताना अडचणी येणार आहेत. नेहमीची वतनदारी रुग्णालयात दाखविता येणार नाही. या भीतीने ही रुग्णालये शासन नियंत्रणाखाली देण्यास नगरसेवकांचा विरोध आहे. यामुळे रुग्णांनाही दर्जेदार सुविधा मिळत नाहीत याचा विचार लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही, असा आरोप देसाई यांनी केला आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील परिचारिकांना नागरी आरोग्य केंद्रात सेवा देणे बंधनकारक आहे. या सेवेचे वेतन या परिचारिकांना मिळत असते.  मागील अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील परिचारिकांना रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्त करत आहे. ही केंद्र शासनाची दिशाभूल आहे. याचाही विचार शासनाने करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय शहरी अभियानातील परिचारिका स्वत:हून रुग्णालयात रुग्णसेवा देण्याची तयारी दाखवीत असल्याने त्यांची तेथे नेमणूक करण्यात येते. यापुढे अभियानातील ज्या परिचारिका स्वत:हून रुग्णालयात सेवा देण्याची तयारी दर्शवतील, तसे लिहून देतील त्यांनाच रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी ठेवण्यात येईल. उर्वरित परिचारिकांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल.
-डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी