शिळफाटा परिसरातील दावडी, उंबार्लीवर गोदामांसाठी अतिक्रमणे

कल्याण : कल्याण-शिळफाटा तसेच १४ गावांच्या परिसरातील रस्त्या कडेला असलेल्या मोक्याच्या जागा बळकावून झाल्यानंतर भंगार दुकान मालकांनी आता आपली वाढीव गोदामे याच रस्त्यावरील दावडी, उंबार्ली (कावळ्यांचे गाव) येथील निसर्गरम्य टेकड्यांवर उभारण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा संपूर्ण पट्टा बेकायदा भंगार वखारींनी गिळंकृत केला जात असून मुंबई, भिवंडी पट्टयातील ठराविक माफियांची या भागात चलती आहे.

वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मार्गालगत उभ्या रहात असलेल्या या बेकायदा पट्टयाकडे डोळेझाक करण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपयांचा नैवद्य या माफियांकडून चढविला जात असल्याची चर्चा असून शीळ, डायघर तसेच आसपासच्या परिसरातील पोलीस ठाणी तसेच तहसील यंत्रणांमध्ये पदस्थापनाही त्यासाठी मलईदार ठरु लागली आहे.

मुंब्रा, कल्याण फाटा, कल्याण-शिळफाटा रस्त्यालगतच्या मोक्याच्या आणि मोकळ्या जागांवर आजवर शेकडोंच्या संख्येने बेकायदा गोदामे उभी राहीली आहेत. कल्याण-शिळफाटा, मुंब्रा भागात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीमुळे ठाणे महापालिकेने मध्यंतरी मध्यंतरी वाहतूक पोलिसांच्या मदतीने यापैकी काही भंगार गोदामांवर कारवाई केली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत रस्ते रुंदीकरणाची कामे सुरु असल्यामुळे यापैकी काही गोदामांवर कारवाई झाली. त्यामुळे बेकायदा पद्धतीने गोदामे चालविणाऱ्या अनेक माफियांनी सोनारपाडा, दावडी, गोळवली, पिसवली, उंबार्ली भागातील मोकळ्या माळरानाच्या मोकळ्या जागांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. माळरानाची जमीन नुसती पडिक ठेवण्यापेक्षा स्थानिक जमीन मालक या भंगार दुकानाच्या मालकांना गोदामासाठी आपल्या जागेत जागा उपलब्ध करुन देऊ लागला आहे. यासाठी महिन्याला लाखो रुपयांचे भाडे मालकांना मिळत असून बुधवारी अशाच एका गोदामाला आग लागून हा संपूर्ण परिसर धोक्यात आला होता.

निसर्गरम्य टेकड्या लुप्त

डोंबिवली पूर्वेत स्वामी समर्थ मठ भागातील भोपर टेकडी ही निसर्गप्रेमी, प्रभातफेरीसाठी येणाऱ्या रहिवाशांना मोकळे निसर्गरम्य ठिकाण होते. विविध प्रकारचे पक्षी,  वनसंपदा या भागात होती. मात्र, मागील पाच ते सहा वर्षात भूमाफियांनी ही टेकडी चाळी, इमारतींसाठी खोदून भुईसपाट केली. आता येथे भंगार मालक दुकाने थाटून बसले आहेत. टायर, तांबे, पितळेच्या, लोखंडी भंगार साहित्य वितळवण्यासाठी तेथे सतत भंगार जाळण्यात येते. या भंगाराचा धूर या भागात प्रदूषण करतो.  या भंगार दुकानांना आजुबाजुने गेलेल्या वीज वाहक तारांमधून चोरीने आकडे टाकून वीज पुरवठा घेतला जातो. अशा वीज पुरवठ्याच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाले की मग भंगार दुकानांना आगी लागतात. काही वर्षापूर्वी गोळवली येथे रसायनाचा भंगार टँकर तोडण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला होता.

१४ गावांची अवकळा

दावडी, उंबार्ली गावांच्या हद्दीत वन विभाग, डोंबिवलीतील एक गोरक्षण करणाऱ्या संस्थेची शेकडो एकर जागा आहे. या जागा स्थानिक शेतकरी, जमीन मालकांनी बळकावल्या असून त्या भंगार दुकानदारांना गोदामासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अवजड, लहान सर्व प्रकारचे भंगार ठेवण्यासाठी मुबलक जागा असल्याने भंगार मालक मुंब्रा, दहिसर-मोरी, कल्याण-शिळफाटा, भिवंडी परिसरातील भंगार दुकानदारांचे साहित्य रात्रीच्या वेळेत वाहतूक करुन डोंबिवली परिसरातील गोदामांमध्ये साठयासाठी आणून ठेवत आहेत. हा साठा रात्रीच्या वेळेत ट्रक, टेम्पोमध्ये भरून मुंबईत विक्रीसाठी नेला जातो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

दावडी, उंबार्ली येथील भंगार दुकाने नियमबाह्यापणे निसर्गरम्य टेकडीवर सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत शहरातील भोपर, नेतिवली टेकड्या माफियांनी उद्धवस्त केल्या. आता उंबार्ली, दावडी येथील टेकड्या भंगार दुकानदार गिळंकृत करतील असे चित्र आहे. या बेकायदा भंगार दुकानदारांवर कारवाई करावी म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. – राजेश कदम, मनसे नेते