प्रवाशांना रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी स्कायवॉकची निर्मिती करण्यात आली. मात्र कल्याणमधील स्कायवॉक प्रवाशांसाठी आहे की भिकारी, गुर्दल्ल्यांसाठी, असा प्रश्न पडला आहे. कारण या स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ल्यांनी आपला संसार मांडला आहे. आधीच स्कायवॉकवर दुतर्फा विक्रेत्यांचा गराडा असतो, त्यात आता गर्दुल्ल्यांच्या कुटुंबांची भर पडल्याने प्रवाशांचे अडथळे आणखी वाढले आहे.  
कल्याणमधील रहिवाशांना कुठल्याही दृष्टीने हा स्कायवॉक सोयीचा वाटत नाही. कारण स्कायवॉकच्या दुतर्फा मांडलेल्या विक्रेत्यांच्या दुकानातून वाट काढत प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानक गाठावे लागते. त्यात आता भिकाऱ्यांनी आपली कुटुंबे वसविल्याने प्रवाशांना आता स्कायवॉकची पायरी नक्की चढावी का नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. भांडीकुंडी, कपडेलत्ते व अन्य सामग्री घेऊन या मंडळींनी स्कायवॉक काबीज केला आहे. गर्दुल्ल्यांना अमली पदार्थाच्या सेवनासाठी स्कायवॉकच्या निमित्ताने जणू काही नवीन जागाच उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच स्कायवॉकवर रात्रीच्या वेळी मद्याच्या बाटल्या, इंजेक्शन्स पाहायला मिळतात. स्कायवॉकवरील दिवसेंदिवस होत चाललेल्या भयावह चित्रामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे घाबरून महिला प्रवासी, तरुण मंडळी रात्रीच्या वेळी स्कायवॉकवरून जाणे टाळतात.  

रात्रीच्या वेळी अनेकदा स्कायवॉकवरील दिवे बंद असल्यामुळे स्कायवॉकवरून प्रवास करणे त्रासदायक ठरते. स्कायवॉकवर बऱ्याच ठिकाणी चालण्यासाठी टाकण्यात आलेल्या फरश्या तुटल्यामुळे त्या निघाल्या आहेत. या फरश्यांचा वापर करून गर्दुल्ले प्रवाशांवर हल्ला तर करणार नाहीत ना ही भीती येथून रात्रीच्या वेळी प्रवास करताना कायम मनात असते.
-अमित पेठे, कल्याण.  

स्कायवॉकवरील भिकारी आपल्या कुटुंबासमवेत स्कायवॉकवरच जेवायला बसतात. त्यामुळे स्कायवॉकवर अस्वच्छता होते. स्कायवॉकवर टांगण्यात आलेल्या जाहिरातींच्या फलकामुळे मिळणाऱ्या आडोशाचा फायदा भिकारी आपले घर वसवण्यासाठी करतात.सचिन वेटे, कल्याण.

मी नुकताच पदभार स्वीकारल्याने या प्रश्नाविषयी मला काहीही कल्पना नाही. संबंधित स्कायवॉक मी पाहिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाविषयी मी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना शहानिशा करण्यास सांगेन
– मधुकर शिंदे, ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी.

समीर पाटणकर, कल्याण