कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकला नशाबाज आणि गर्दुल्ल्यांमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री दहा वाजल्यानंतर कल्याण परिसरातील गर्दुल्ले आरामासाठी स्कायवॉकवर जमा होतात. हे गर्दुल्ले नशापान करीत असल्याने जवळील नशेची वस्तू गरम करण्यासाठी ते स्कायवॉकवरच शेकोटी पेटवतात. शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव आणि त्याभोवती हे गर्दुल्ले नशापान करीत बसतात. स्कायवॉकवर फायबरचे फर्निचर असल्याने तापून ते पेट घेते. स्कायवॉकला सतत आगी लागण्याचे गर्दुल्ले हे मुख्य कारण आहे, असे स्कायवॉकची देखभाल करणाऱ्या ठेकेदारांनी सांगितले.

अनेक वेळा स्कायवॉकवर रात्रीच्या वेळेत फेऱ्या मारून गर्दुल्ल्यांना हटविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. पण गर्दुल्ल्यांच्या जवळ धारदार शस्त्र किंवा चाकू असतो. त्यांना हटकले तर नशेत असल्याने ते शस्त्र घेऊन पाठलाग करतात आणि हटकणारा बेसावध असेल तर त्याच्यावर वार करतात. टोळी करून हे गर्दुल्ले वावरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे अवघड होते. गस्तीवरील पोलीस तेवढय़ा वेळेपुरते त्यांना हुसकावतात. पण रात्री उशिरा पुन्हा ते स्कायवॉकवर अवतरतात, असे ठेकेदाराने स्पष्ट केले. काही वेळा सिगारेटची पेटती थोटके स्कायवॉकच्या गल्लीत फेकून देतात. थोटकामुळे धुमसत धुमसत कचरा पेटतो आणि त्याबरोबर स्कायवॉकला आग लागते असे कारणही पुढे आले आहे.