कल्याण स्थानकाच्या पश्चिमेकडील स्कायवॉकला बुधवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचा फटका केवळ या स्कायवॉकवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाच नाही, तर स्थानक परिसरातील रस्त्यांवरील वाहनचालकांनाही बसला. आगीमुळे स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. बस आगारासमोरच ही आग लागल्याने आगारातील बसना वाहतूक अडथळा निर्माण झाला, तर कल्याण शहरात व भिवंडीकडे जाणाऱ्या रिक्षांना गर्दीतून मार्ग काढण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वाहतुकीचा मोठा फटका बसला नि आगीतून वाहतूक कोंडीच्या फुफाटय़ात पडलोय की काय, अशी खंत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होती.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात या स्कायवॉकला आग लागली होती. त्यानंतर या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आग लागली होती. आता पंधरवडय़ात दुसऱ्यांदा आग लागल्याने या स्कायवॉकच्या अग्निसुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा स्कायवॉक बांधल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारची अग्निसुरक्षा यंत्रणाच कार्यान्वित नाही. आग लागल्यानंतरही त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना अवलंबली नसल्याने या घटना वारंवार घडत असल्याची धक्कादायक माहिती कल्याणच्या अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली. वारंवार आगीच्या भक्ष्यस्थळी पडत असलेल्या स्कायवॉकवरील आगीने सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी स्कायवॉकचे मोठे नुकसान होत आहे.  

आगीचे कारण गुलदस्त्यात
स्कायवॉकला लागलेल्या आगीविषयी अग्निशमन दलाने गर्दुल्ल्यांनी पेटवलेल्या शेकोटीचे कारण दिले असले तरी या विषयी कोणत्याही प्रकारचे ठोस कारण देण्यात आलेले नाही. शॉर्टसर्किटच्या कारणाची चाचपणी केली जात असली तरी नेमके कारण अग्निशमन दलाला कळू शकले नाही.