कल्याण : करोना रुग्णांकडून शासन शुल्कापेक्षा वाढीव दराने देयकांची आकारणी करणे, महापालिका तसेच शासकीय खाटांची स्वतंत्र नोंदी ठेवण्यात हयगय करणे, असे आक्षेप नोंदवत कल्याण डोंबिवली महापालिकेने येथील श्रीदेवी या खासगी कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची कारवाई ए अ‍ॅन्ड जी खासगी रुग्णालयावरही केली होती. श्रीदेवी रुग्णालयात गेल्या महिन्यापासून करोना रुग्णांवर उपचार केले जात असताना त्याची माहिती रुग्णालयाने महापालिकेपासून दडवून ठेवली होती. याशिवाय करोना रुग्णांकडून शासन दरापेक्षा वाढीव शुल्क आकारणी करणे, महापालिका व खासगी खाटांची स्वतंत्र नोंदी ठेवण्यात हयगय करणे, लेखा परीक्षकांनी शुल्क देयकांची माहिती मागितली असता त्यांना सहकार्य न करणे, त्यांच्याशी उद्धट वर्तन करणे, अशा तक्रारी व्यवस्थापनासंबंधी होत्या. या प्रकरणी महापालिकेने रुग्णालय व्यवस्थापनाला कारवाईची नोटीस बजावली होती. महापालिकेच्या नोटिशीचा रुग्णालयाने समाधानकारक खुलासा केला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनियमितता दूर होत नाहीत तोवर हा निर्णय लागू असेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली. या रुग्णालयाला नवीन करोना रुग्ण दाखल करून घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या रुग्णालयात दाखल करोना रुग्णांवर शासन आदेशाप्रमाणे उपचार होणे, त्यांना सुविधा मिळावी तसेच रुग्णालयातून सर्व करोना रुग्णांना घरी सोडेपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर यांची रुग्णालयावर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या रुग्णालयात बाह्य़ रुग्ण विभागात हिमोडायलेसिस रुग्ण घेण्यास फक्त परवानगी देण्यात आली आहे.