ठाणे, कल्याण, नवी मुंबईदरम्यान प्रवासी वाहतुकीला पर्याय

मुंबई महानगर प्रदेशात उभारण्यात आलेल्या मेट्रो वाहतुकीचे वर्तुळ पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ठाणे-भिवंडी-कल्याणदरम्यानच्या ‘मेट्रो-५’ प्रकल्पास हिरवा कंदील दाखवतानाच राज्य सरकारने हा मेट्रो मार्ग कल्याणपासून नवी मुंबईतील तळोजाला जोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कल्याण-तळोजा मार्गावर ‘मेट्रो-११’ प्रकल्पाच्या उभारणीसाठी अभ्यास करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात वडाळा ते कासारवडवली (ठाणे), कापूरबावडी ते कल्याण (व्हाया भिवंडी), कल्याण ते तळोजा आणि तळोजा ते बेलापूर अशा मेट्रो मार्गातून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्यासाठी ठाण्यापाठोपाठ कल्याण-भिवंडी मेट्रोला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. हा नवा मेट्रो मार्ग २३.५० किलोमीटर अंतराचा असून या मार्गावर तब्बल १६ स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाचे एक टोक कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तर दुसरी बाजू ही ठाण्यातील कापुरबावडी चौक असणार आहे. कापुरबावडी चौकालगत उभारण्यात येणाऱ्या मेट्रो स्थानकातून सुटणारी गाडी बाळकुम, काल्हेर, कशेळी, पूर्णा, अंजूर फाटा अशा मार्गाने पुढे भिवंडी-कल्याणच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे ठाण्यातील घोडबंदर मार्गासह भिवंडीच्या दिशेने विकसित होत असलेल्या काल्हेर, कशेळी, खारबाव, अंजूर फाटा या संपूर्ण परिसरातील बांधकाम व्यावसायासाठी हा प्रकल्प जीवनवाहिनी ठरणार आहे. सद्य:स्थितीत भिवंडी परिसरात रेल्वेचे जाळे विकसित झालेले नाही. त्यामुळे भिवंडी आणि आसपासच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना मध्य रेल्वेमार्गावर येण्यासाठी रस्ते मार्गे कल्याणपर्यंत यावे लागते. या नव्या मेट्रो मार्गामुळे भिवंडीकरांना कल्याणला जाण्याऐवजी मेट्रोद्वारे ठाण्यातील कापुरबावडीपर्यंत येऊन पुढे मेट्रो-४ मार्गे कापुरबावडी ते वडाळ्यापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

साधारण वर्षभरापूर्वी झालेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी तळोजा-कल्याण मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यासंबंधी प्रस्ताव पुढे आणला होता. त्यानुसार तळोजापर्यंत येणारी मेट्रो पुढे शिळ-महापे-डोंबिवलीमार्गे थेट कल्याणपर्यंत नेण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. या प्रकल्पाला मेट्रो-११ असे नाव देण्यात आले असून ही मेट्रो आणि सिडकोची नवी मुंबईतील मेट्रो एकमेकांना जोडण्याचा दूरगामी आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रकल्पाची सुसाध्यता व आर्थिक नियोजनासंबंधीचा अभ्यास लवकरच सुरू केला जाईल.