महसूल विभागाची आडमुठी भूमिका; सव्वा नऊ कोटींची मागणी; खुराडय़ातील जागेतच कामकाज
कल्याणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चिकणघर भागात लहानग्या जागेत कार्यरत आहे. या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला उंबर्डे येथे परिवहन विभागासाठी आरक्षित असलेला चार एकर क्षेत्रफळाचा भूखंड महसूल विभागाने द्यावा, अशी मागणी परिवहन विभागाने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. मात्र, या भुखंडाच्या बदल्यात परिवहन विभागाने सुमारे सव्वा नऊ कोटी रुपयांचा भरणा करावा; तरच हा भूखंड हस्तांतरित करता येईल, अशी भूमिका महसूल विभागाने घेतली आहे. महसूल विभागाच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे.
तीन ते चार वर्षांपासून उंबर्डे परिसरातील परिवहन विभागासाठी राखीव असलेला भूखंड कल्याण उपप्रादेशिक कार्यालयाला शासनाने द्यावा म्हणून उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. कल्याण उपप्रादेशिक कार्यालय सध्या चिकणघर येथील खुराडय़ाच्या जागेत कार्यरत आहे. चाळींसारख्या खोल्यांमध्ये सुमारे ५० ते ६० कर्मचारी बसून काम करतात. कागदपत्रे, परवानाधारकांची गर्दी, बसायला-उठायला जागा नाही, अशा कसरतीमध्ये कर्मचारी काम करीत आहेत. हे कार्यालय बिर्ला महाविद्यालय परिसरात आहे. आजूबाजूला शाळा आहेत. त्यात दररोज शेकडो वाहने कल्याण ‘आरटीओ’त तपासणी, परवान्यांसाठी येतात. या भागात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने ही सगळी वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे या भागात नियमित वाहतूकीची कोंडी होते. हा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी तीन वर्षांपासून ‘आरटीओ’ विभाग कल्याण शहराबाहेर स्वतंत्र भूखंड देण्याची मागणी शासनाकडे करीत आहे. वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला जागा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. काही विकासक, जमीनमालक परस्पर पाचर मारण्याची कामे करीत असल्याने, जागा मिळणे अवघड झाले असल्याची चर्चा आहे.
‘आरटीओ’ अधिकारी नवीन जागा पदरात पडावी आणि खुराडय़ात असलेले चिकणघर येथील कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना मंत्रालय पातळीवरून खीळ घालण्यात आल्याने अधिकारी अस्वस्थ आहेत. मंत्रालय स्तरावर हा विषय प्रलंबित असल्याने आरटीओ अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नाहीत.

कल्याण ‘आरटीओ’ला शहराबाहेर प्रशस्त जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महसूल विभागाकडे पाठविला आहे. उंबर्डे येथे परिवहन विभागासाठी स्वतंत्र भूखंड आरक्षित आहे. ही जागा कल्याण ‘आरटीओ’ला दिल्यास बिर्ला महाविद्यालय परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. ‘आरटीओ’ला प्रशस्त जागा शहराबाहेर उपलब्ध होईल. सध्याचे खुराडय़ात असलेले कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित केले तर एकाच जागी वाहनचालक परीक्षा केंद्र, वाहनांसाठी ट्रॅक उभारणे, जुने, नवीन दस्तऐवज ठेवण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होईल. एकीकडे सरकारने ‘स्मार्ट सिटी’च्या घोषणा करायच्या आणि त्याच सरकारमधील एका मंत्र्याने केवळ रक्कम भरणा करीत नाही, म्हणून ‘आरटीओ’चा विकासाचा प्रस्ताव अडवून ठेवायचा हे योग्य दिसत नाही.
– रवींद्र पाटील, माजी नगरसेवक, शिवसेना</strong>