कल्याणमधील तरुणांचे नववर्ष स्वागत सागरी किल्ल्यांवर; किल्ल्यांच्या सद्य:स्थितीचा ‘दृक्श्राव्य’ वेध घेणार
सरत्या वर्षांचा निरोप आणि नववर्षांच्या स्वागत सोहळय़ाचा जल्लोश, मेजवानी कुठे करायचे, याचे बेत आखले जात असतानाच कल्याणमधील काही तरुणांनी पार्टी, नृत्य, धिंगाणा अशा ‘पारंपरिक’ प्रथेला तिलांजली देत सागरी किल्ल्यांच्या सहवासात नववर्षांचे स्वागत करण्याचा निर्धार केला आहे. कल्याण-डोंबिवलीतील तरुणांची ‘वाइल्ड व्हिजन’ ही संस्था नववर्षांच्या निमित्ताने राज्यातील २१ सागरी किल्ल्यांना भेट देणार आहे. एवढेच नव्हे तर या किल्ल्यांच्या सद्य:स्थितीचे दृक्श्राव्य चित्रीकरण करून यूटय़ूबच्या माध्यमातून ती साऱ्यांसमोर आणण्याचा संकल्पही या तरुणांनी सोडला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या गडकिल्ल्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या गडकिल्ल्यांकडे समाजाचे लक्ष वेधून देण्याचा निर्धार करत कल्याणमधील ‘वाइल्ड व्हिजन’ या संस्थेचे सुशांत करंदीकर, कृष्णा नाईक आणि विकास चव्हाण हे तीन तरुण शुक्रवारपासून सागरी किल्ल्यांच्या भ्रमंतीवर निघणार आहेत. मुरुड-जंजिरा ते सिंधुदुर्गपर्यंतच्या २१ किल्ल्यांना ही मंडळी भेट देणार आहेत. उरण परिसरातून या मंडळींच्या मोहिमेचा शुक्रवारी प्रारंभ होणार असून किनारपट्टीवरून समांतर रस्त्यावरून ही मंडळी प्रवास करणार आहेत. या प्रवासातील ७०० किमीचे अंतर सायकलने तर आवश्यक ठिकाणी प्रवासी बोटीतून त्यांची मार्गक्रमणा होईल. २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे, अशी माहिती संस्थेने दिली. तसेच हा संपूर्ण प्रवास आणि सागरी किल्ल्यांच्या सद्य:स्थितीचा लेखाजोखा कॅमेऱ्यात टिपून यूटय़ूब चॅनेलच्या माध्यमातून मांडण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

या किल्ल्यांची भ्रमंती
द्रोणागिरी, खांदेरी-उंदेरी, कुलाबा, कोरलई, रेवदंडा, बिरवाडी, जंजिरा, पद्मदुर्ग, बाणकोट, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, यशवंतगड, विजयदुर्ग, देवगड, भरतगड, सिंधुदुर्ग, निवती, रेडी या दुर्गाची मोहीम ही मंडळी करणार आहेत.
सागरी किल्ल्यांची सद्य:स्थिती समोर येणे गरजेचे..
केवळ हौशी दुर्गप्रेमी मंडळी किल्ल्यांवर जात असली तरी जनसामान्य आणि शहरवासीय यापासून लांब आहेत. सागरी किल्ल्यांची सद्य:स्थिती कोणत्या तरी माध्यमातून समोर येणे गरजेचे होते, त्यातूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे सुशांत करंदीकर यांनी सांगितले.