अमनच्या मृत्यूबाबत वडिलांना दूरध्वनीवरून माहिती

दोन वर्षांपूर्वी कल्याणमधून घर सोडून आयसिसमध्ये सामील होण्यासाठी गेलेल्या तरूणांपैकी अमन तांडेल (२२) याचा सिरियातील हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तांडेल कुटुंबियांना परदेशातून शनिवारी रात्री दूरध्वनीवरून अमनच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी कल्याणमधील इतर तीन सहकाऱ्यांसोबत अमन आयसिसमध्ये सामील होण्यासाठी गेला होता. अमनचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने अमनच्या वडिलांना फोनवरून दिली. अमनच्या वडिलांनी त्याला तुम्ही कोण बोलत आहात, असे विचारले. त्यावेळी मला फक्त अमनच्या मृत्यूची माहिती देण्यास सांगितले आहे, असे बोलून समोरच्या व्यक्तीने फोन बंद केला. ही बातमी सोमवारी  सर्वत्र पसरली. या प्रकरणाची माहिती बाजारपेठ पोलिसांना देण्यात आली आली आहे. आयसिसमध्ये सामील होण्यासाठी जाण्यापूर्वी अमन हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.

आयसिसमध्ये सामील होण्यासाठी कल्याणमधून गेलेल्या चौघांपैकी आरिफ मजीद याला दीड वर्षांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने भारतात आणून अटक केली. या तरूणांपैकी सहिम तानकी हा गेल्या वर्षी इराकमध्ये हल्ल्यात मृत्युमुखी पडला. चौथा युवक फहाद शेखबाबत मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.

  • या वर्षी आयसिसकडून प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत अमन आणि अन्य तरुण काश्मीर, गुजरात आणि मुजफ्फरनगर येथे मृत्यू झालेल्या मुस्लीम नागरिकांवरील हल्ल्याचा बदला घेऊ, असे धमकावताना दिसले होते.
  • गेल्या वर्षीपर्यंत अमन आपल्या कुटुंबीयांच्या नियमित संपर्कातही होता. मात्र त्यानंतर त्याचा संपर्क कुटुंबीयांशी झाला नव्हता.