ऑनलाइन पद्धतीने चलान भरण्यास नागरिकांची टाळाटाळ

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील काशिमीरा वाहतूक विभागाचा सुमारे ५ कोटी २  लाख रुपये पर्यंतचा दंड वसुल करणे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन प्रणालीद्वारे दंड भरण्यास नागरिक टाळाटाळ करत असल्याने उत्पनात देखील मोठी घट झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन व बेकायदा वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर काशीमिरा  वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाते.ई चलन प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून  ही कारवाई इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सुरू केली आहे. शहरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडे  इलेक्ट्रॉनिक कारवाईसाठी यंत्र आहेत. त्याद्वारे ई चलान तयार करून दंड आकारला जात आहे. या प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे आकरलेला दंड व त्याची होणारी वसुली यामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. या दंडामुळे अनेक वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करू लागले आहेत.

सन २०२० मध्ये वाहतूक पोलिसांनी १ लाख ५२ हजार ६८६ जणांवर  कारवाई करून ५ कोटी ७९ लाख ९२ हजार ४५० रुपये इतका दंड ठोठावला होता. त्यातील फक्त  ३२ हजार ५३९ नागरिकांनी हा दंड भरला. तर १ लाख २० हजार १४७ जणांनी दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे. तर यंदाच्या २०२१ या चालू वर्षांत १५ हजार ९६ जणांवर ई चलान कारवाई करून ५३ लाख ३५  हजार  २०० इतका दंड लावण्यात आला आहे. यातील फक्त २७७१ नागरिकांनी हा दंड भरला असून यातील ४१  लाख ९०  हजार ५०० रुपये इतक्या दंडाची रक्कम अजूनही थकीत राहिली आहे.

हा  दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतात. ज्यावेळी नाकाबंदी असते त्यावेळी वाहने थांबवून दंडाची रक्कम शिल्लक आहे का याची तपासणी केली जाते. शिल्लक असेल तर ती रक्कम भरण्यास सांगितले जात असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश कड यांनी  दिली.