News Flash

कातकरी जमातीच्या लोकसंख्येत घट

ठाणे जिल्ह्य़ातील कातकरी जमातीचीही लोकसंख्या कमी झाली आहे.

शासनाकडून कातकरी समाजाच्या विकासासाठी मोहीम, स्थलांतर रोखण्यासाठीही प्रयत्न

ठाणे जिल्ह्य़ातील कातकरी जमातीचीही लोकसंख्या कमी झाली आहे. अंबरनाथ तालुक्यात अवघे १,६२९ कातकरी शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विकासासाठी आणि स्थलांतरण रोखण्यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला असून कातकरी उत्थान अभियानाद्वारे त्यांचा विकास करण्याची योजना आखण्यात आली आहे.

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यापासून ते थेट सिंधुदुर्गपर्यंत अनुसूचित जमातींमध्ये कातकरी समाजाची नोंद आढळते. मात्र शिक्षणाचा अभाव, कायमचा रोजगार नसणे, आरोग्यविषयक जागृती नसणे अशा विविध कारणांमुळे कोकणातील कातकरी समजाचे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत होते. त्यामुळे त्यांची ठोस आकडेवारी नक्की कळत नव्हती. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत विखुरलेल्या कातकरी समाजाची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी कातकरी उत्थान अभियान हाती घेतली आहे. कोकण विभागात सर्वाधिक कातकरी समाजाची संख्या ठाणे जिल्हा आणि त्यातही अंबरनाथ तालुक्यात असल्याचे बोलले जात होते. मात्र कातकरी उत्थानात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अंबरनाथ तालुक्यात अवघी ५०८ कुटुंबे आणि त्यात एक हजार ६२९ कातकरी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थलांतरित कुटुंबांची संख्या त्यात ग्राह्य़ धरल्यास अवघे तीन हजार कातकरी तालुक्यात असल्याची शक्यता तहसीलदार कार्यालयातर्फे व्यक्त केली गेली आहे. आदिवासी प्रवर्गातील इतर जमातींच्या लोकांनी शिक्षण, रोजगार यांच्या संधी मिळवत आपला विकास केला. मात्र कातकरी समाजाच्या बाबतीत यातही अनास्थाच दिसून आली आहे. त्यामुळे अवघे पाच ते सात टक्के कातकरी शिकलेले आढळून आले आहेत. त्यातही ९० टक्के कातकऱ्यांचे शिक्षण प्राथमिकपर्यंतच असल्याची बाबही उजेडात आली आहे. कायम स्वरूपाच्या रोजगाराबाबतही कातकरी समाज दुर्लक्षितच असून शिक्षणाअभावी त्यांना फक्त रोजंदारीचे काम त्यांना मिळते.

त्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवरही होतो. नुकत्याच केलेल्या या सर्वेक्षणातून कातकरी समाजाची एकूणच आर्थिक, शैक्षणिक स्थिती समोर आली आहे.  अंबरनाथ तालुक्यात वांगणी, हाजीमलंगवाडी या गावात नुकतेच प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे आणि तहसीलदार प्रशांत जोशी यांनी विविध दाखल्यांचे वाटप केले.

कातकरी आदिवासींना आवश्यक दाखल्यांचे वाटप

सध्या कातकरी समाजाला आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्र, जातीचे दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, अधिवास प्रमाणपत्र, वयाचे दाखले, रोजगार हमीचे ओळखपत्र आणि विविध योजनांची पत्रे दिली जात आहेत. बहुतेक कातकऱ्यांना त्यांचे वयही माहीत नसल्याने त्यांच्या आरोग्य तपासणीतून त्यांना वयाचे पत्र देण्यात येत आहे.

यापुढचा टप्पा त्यांच्या रोजगारासंबंधी असणार असून त्यांचे स्थलांतरण थांबवून त्यांचे आयुष्य स्थिरस्थावर करण्याचा उद्देश या अभियानाचा आहे.

विजय तळेकर, नायब तहसीलदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2018 2:32 am

Web Title: katkari tribe people population
Next Stories
1 बचतगटांतील उत्पादनांना संक्रातीनिमित्त मागणी
2 ठाणे मेट्रोचे काम लवकरच
3 मुंबई ते दिल्ली इलेक्ट्रिक कॉरीडोर!
Just Now!
X