‘ज्ञानेश्वर ते नायगावकर, एक काव्य प्रवास’ कार्यक्रमाचे आयोजन
‘जो ना देखे रवी तो देखे कवी’ याचा प्रत्यय नुकताच ब्राह्मांड कट्टय़ावर आला. रविवारी ब्रह्मांड कट्टय़ावर आम्ही कला प्रतिष्ठानतर्फे ‘ज्ञानेश्वर ते नायगावकर एक काव्य प्रवास’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महेंद्र कोंडे, सीमा कोंडे आणि विनोद पितळे यांनी यावेळी कवितांचे सादरीकरण केले.
कविता म्हणजे उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार, असे रसभरीत वर्णन महेंद्र कोंडे यांनी यावेळी केले. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे तर त्यानंतरच्या कवितेतून सामाजिक जीवनातील आढावा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
कवी विं. दा. करंदीकरांची ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’ ही वास्तववादी तर ‘आई नावाचं गाव असतं, गजबजलेलं गाव असतं’ ही भावनाप्रधान कविता ऐकताना रसिक भारावून गेले. या पारंपरिक कवितेपलीकडील बा. सी. मर्ढेकरांची प्रसिद्ध ‘गणपत वाणी’ ही स्वप्नांच्या दुनियेत रमणारी कविता कवी नारायण सुर्वे यांच्या सामान्य माणसांच्या जीवनांचे वर्णन करणाऱ्या कविता सादर
केल्या.

गाजलेल्या कवितांचे सादरीकरण
इंदिरा संत यांची ‘नको पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंदमौळी’ ही भावनिक कविता सीमा कोंडे यांनी सादर केली. तसेच ‘पैठणी’ या कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेतून आजीची माया व लोभस रूप दाखवून दिले. कवी मंगेश पाडगावकर यांची आजोबा कविता ऐकताना उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे मनोगतही यावेळी सादर करण्यात आले. त्याचबरोबर कवी अशोक बागवे, सुरेश भट, ग्रेस, प्रवीण दवणे, प्रज्ञा पवार, रामदास फुटाणे, सुधीर मोघे, भाऊसाहेब पाटणकर, अशोक नायगावकर आदी कवींच्या गाजलेल्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाला लेखक सदाशिव टेटविलकर, समीक्षक प्रा.अरविंद दोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.