३० टक्के विजयी उमेदवार गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे
एरवी सांस्कृतिक शहर असा टेंभा मिरविणाऱ्या कल्याण डोंबिवली शहरांचे पालकत्व भूषविणाऱ्या महापालिकेत पुन्हा एकदा गुन्हेगार, कमी शिक्षित आणि तरीही कोटय़धीश असे नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेल्या १२० नगरसेवकांपैकी ७१ उमेदवार कोटय़धीश आहेत, तर ३० नगसेवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २६ नगसेवकांवर हल्ला, खून, अपहरण, महिलांचा विनयभंग अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ५४ नगरसेवकांचे शिक्षण हे आठवीपेक्षाही कमी झाले आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉम्र्स या सामाजिक संस्थांनी नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रावरून केलेल्या सर्वेक्षणातूनही बाब स्पष्ट झाली आहे.
कल्याण-डोंबिवली निवडणुकीमध्ये ११८ प्रभागांमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी सुमारे ७५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर १२० नगरसेवक (दोघे बिनविरोध) निवडून आले. त्यापैकी ११९ विजयी उमेदवारांपैकी ७१ उमेदवार हे कोटय़धीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोटय़धीश उमेदवारांमध्ये भाजपच्या २९ तर शिवसेनेच्या २८ नगरसेवकांचा समावेश आहे. कँाग्रेसचे चार, मनसेचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवकही कोटीहून अधिक संपत्ती असलेले आहेत. गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांची संख्या ३० म्हणजेच २५ टक्के आहे. त्यापैकी गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांची संख्या २६ (२२ टक्के) आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पक्षांमध्ये शिवसेनेचे १२, भाजपचे ११, मनसेचे १, राष्ट्रवादीच्या एका नगसेवकाचा समावेश आहे. .

महापालिकेत ३ अशिक्षित नगरसेवक..
महापालिकेचे कामकाज पाहण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ३ नगरसेवक हे अशिक्षित असून आठवीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांची संख्या ५१ आहे, तर १० वी आणि १२ पर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या ३८ आहे. १२ नगरसेवक पदवीधर आहेत. तर उच्चशिक्षितांची संख्या ११ आहे. तर ४ नगरसेवकांनी शैक्षिणक माहितीच दिलेली नाही.

मालदार नगरसेवक
* १२ नगरसेवकांची मालमत्ता १० कोटींपेक्षा अधिक.
* शिवसेनेच्या शालिनी सुनील वायले यांची मालमत्ता १०६ कोटी ५७ लाख १३ हजार १७५ रुपये.
* भाजपच्या मनोज राय यांच्याकडे ७६ कोटी ४५ लाख १० हजार ३७१ रुपयांची मालमत्ता.
* सात नगरसेवकांकडे एक कोटींहून अधिक देणी.
* ११९ पैकी ३५ नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रात प्राप्तिकर तपशील नाही.
* कमी मालमत्ता असलेले नगरसेवक
* पालिकेच्या तीन नगरसेवकांची मालमत्ता एक लाखांहूनही कमी आहे. शिवसेनेच्या हर्षांली थवील (१५ हजार रुपये), सुधीरबासरे (५७ हजार ५५७ रु.) आणि बसपच्या सोनी अहिरे (एक लाख रु.) यांचा त्यात समावेश आहे.