डोंबिवलीत रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले हटवले; पादचाऱ्यांमध्ये समाधान

शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर रात्री आठनंतर कारवाईस सुरुवात केली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

‘ग’ प्रभागाच्या प्रभाग अधिकारी पदी परशुराम कुमावत यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख संजय साबळे यांच्यासह एकाच वेळी रॉथ रस्ता, रेल्वे स्थानक परिसर, स्कायवॉक, पाटकर रस्ता, चिमणी गल्ली, रामनगर, राजाजी पथ परिसरात ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईने फेरीवाल्यांची पळापळ झाली. फेरीवाल्यांचे सामान, वजन-काटे, टेबल, आकडे जप्त करण्यात आले. या कारवाईने पहिल्यांदाच कामत मेडिकल स्टोर्स पदपथावरील फेरीवाले गायब झाले होते. हटाव पथकाने तीन ते चार टेम्पो भरलेला सामानाचा साठा जप्त केला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेताच  शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना निवेदन देऊन दोन दिवसात डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले कायमचे हटविण्याची मागणी केली आहे.

डोंबिवलीत फेरीवाला विरुद्ध शिवसेना हा संघर्ष चिघळण्याची शक्यता विचारात घेऊन प्रभाग अधिकारी कुमावत यांनी फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सांगितले. दरम्यान, यापुढे रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचे सामान जप्त करून प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पथकातील कर्मचाऱ्यांचे दोन गट करण्यात येणार आहेत. आळीपाळीने हे पथक बाजारात तैनात ठेवण्यात येईल. फेरीवाल्यांवर कारवाई करून पुढे गेले की पाठीमागून पुन्हा फेरीवाले रस्त्यावर बसतात. हे टाळण्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून फेरीवाल्यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल. रस्ते, पदपथ न अडता, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.

परशुराम कुमावत, ‘प्रभाग अधिकारी