कागदोपत्री खर्डेघाशी बंद; कामकाज अधिक पारदर्शी होण्याचा दावा
प्रभाग कार्यालयातील बैठकीला या.. बैठकीचे इतिवृत्त तयार करा.. बैठकीत दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करा.. आदेशाची अंमलबजावणी तातडीने करा.. ही कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वर्षांनुवर्षांची कागदोपत्री खर्डेघाशी बंद करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ऑनलाइन कारभाराचा एक पथदर्शी प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामकाज अधिक पारदर्शी होईल, असा दावा केला जात आहे.
महापालिकेतील आयुक्तांसह अन्य महत्त्वाची कार्यालये अशा प्रकारे ऑनलाइन प्रशासकीय कामकाजाने जोडण्याचा प्रशासन विचार करीत आहे. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या कार्यालयात लॅन पद्धत सुरू करण्यात आली आहे. कार्यालयातील बैठकींचे निरोप चुटकीसरशी प्रभाग, अन्य उपविभाग कार्यालयांना या माध्यमातून देण्यात येतील. आतापर्यंत बैठकीचा निरोप देण्यासाठी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी, दूरध्वनी करणे तसेच संबंधित अधिकारी उपलब्ध झाला नाही तर निरोप ठेवणे, असे प्रकार सुरू असत. हे प्रकार यामुळे टाळले जातील, असा दावा केला जात आहे.
बैठकीत ऑनलाइन इतिवृत्त तयार करण्यासाठी तांत्रिक सुविधा तयार करण्यात आली आहे. प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना, त्यांच्या समोरच पडद्यावर बैठकीचा वृत्तांत (इतिवृत्त) टंकलिखित केला जाईल. यापूर्वी इतिवृत्त तयार झाले की काही वेळा त्यात खाडाखोड किंवा काही महत्त्वाचा मजकूर वगळला जात होता. हा प्रकार ऑनलाइन पद्धतीमुळे बंद होणार आहे. बैठकीचे इतिवृत्त अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभाग, विभागीय कार्यालयातील संगणकावर पाहता येईल किंवा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील सभेचा घटनास्थळी तयार झालेला छापील वृत्तांत पेन ड्राइव्हच्या माध्यमातून प्रभाग अधिकारी, अधिकारी, उपायुक्त बैठकीतील इतिवृत्त स्वत:च्या पेनड्राइव्हमध्ये नक्कल करून घेतील, अशी सोय असणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत काम करणे, गतिमान प्रशासन, पारदर्शकता, लपवाछपवीविरहित प्रशासकीय कामकाज करणे या प्रक्रियेमुळे सहज शक्य होईल, असा दावा करण्यात आला आहे. उपायुक्त, प्रभाग अधिकाऱ्यांना महत्त्वाचे काम, बैठक यांचे संदेश ई-मेलच्या माध्यमातून पाठवण्यात येतील. त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून प्रतिसाद द्यायचा. त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यांना हातचे काम सोडून मुख्यालयात येण्याची धावाधाव करावी लागणार नाही. या नस्तींना क्रमांक देऊन ती नस्ती किती दिवसात मार्गी लावली पाहिजे याचा कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात येईल. यामुळे नगरसेवक, अधिकाऱ्यांना नस्तीचे काय झाले म्हणून विविध विभागात फे ऱ्या मारण्याची गरज लागणार नाही.

प्रशासनातील बहुतांशी अधिकाऱ्यांचा वेळ बैठका, नस्ती यामध्येच जातो. शहर म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यावर जी जबाबदारी असते. ती पार पाडण्यात या सततच्या बैठका, येण्या जाण्यामुळे अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. ऑनलाइन कामकाज पद्धतीमुळे अधिकाऱ्यांचा येजा करण्याचा, धावपळीचा वेळ वाचेल. हा वेळ ते त्यांच्याकडे असलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यात, काही नावीन्यपूर्ण उपक्रम आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी वापरू शकतील. गतिमान, पारदर्शक, स्वच्छ प्रशासन हे कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्ष कृतीत आणावे, या उद्देशाने हा ऑनलाइन उपक्रम राबवण्यात आला आहे. – संजय घरत, अतिरिक्त आयुक्त