11 August 2020

News Flash

वारसांची नोकरीची प्रतीक्षा संपली

५३ जणांची सफाई कामगारपदी नियुक्ती; कल्याण-डोंबिवली पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

५३ जणांची सफाई कामगारपदी नियुक्ती; कल्याण-डोंबिवली पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रतीक्षा यादीत असलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेतील ५३ लाभार्थी उमेदवारांना महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने वारसा हक्क तत्त्वावरील सफाई कामगारांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

या नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता असावी म्हणून सर्व लाभार्थी उमेदवारांना पालिकेकडून घरपोच नोंदणीकृत टपाल सेवेने (रजिस्टर एडी) नियुक्तीची पत्रे पाठविण्यात आली आहेत. महापालिका हद्दीत पुरेशी सफाई कामगार संख्या नसल्याने सार्वजनिक स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. केंद्र शासनाची स्वच्छता अभियान मोहीम पालिका हद्दीत राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याने प्रशासनाने निवृत्त, स्वेच्छानिवृत्त, मृत सफाई कामगारांच्या वारसांना पालिका सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय घेताना पालिका प्रशासनाने कमालीची गोपनीयता बाळगली होती. अशाप्रकारे वारसा हक्कावरील कामगार सेवेत घ्यायचे असले की कामगार संघटना पत्र देतात. तसेच काही लोकप्रतिनिधी पत्र देऊन ठरावीक कामगारांना कामावर घेण्यासाठी दबाव आणतात असा पूर्वानुभव आहे. श्रेयाच्या लढाईत कामगारांचा प्रश्न नेहमीच अडगळीत पडतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सर्व कामगारांच्या वैद्यकीय चाचण्या, शैक्षणिक पात्रता पाहून ४८ उमेदवारांना सफाई कामगार, पाच जणांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे लिपिक संवर्गात दाखल करून घेण्यात आले आहे. पालिका सेवेत असलेल्या ४८ कर्मचाऱ्यांमधील १९ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती, १० कामगार मृत झाले आहेत. उर्वरित सेवानिवृत्त झाले होते. शासनाच्या लाड समितीच्या नियमावलीप्रमाणे ५३ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय कडोंमपा प्रशासनाने घेतला.

टपालाने नियुक्तीपत्र

अनेक वर्षे वारसा हक्काने सेवेत येणाऱ्या लाभार्थी उमेदवारांची प्रकरणे प्रलंबित होती. प्रतीक्षा यादीतील क्रमवारीप्रमाणे उमेदवारांना सेवेत येण्याची संधी काही मध्यस्थांमुळे मिळत नव्हती. हा विचार करून यावेळी प्रशासनाने या नियुक्त्या करताना कोणताही बभ्रा न करता सफाई कामगारांच्या सेवेत घेण्याच्या वैद्यकीय, पात्रता चाचण्या पार पाडल्या. त्यांना नोंदणीकृत टपालाने नियुक्तीपत्र पाठवून या नियुक्त्यांमध्ये कोणीही मध्यस्थ न ठेवता पारदर्शकता ठेवली. सफाई कामगारांची संख्या वाढल्याने शहर स्वच्छतेला त्यांची मदत होणार असल्याचे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले.

* या नवनियुक्त कामगारांना पे बॅन्ड ४४४०-७४४० रुपये, ग्रेड वेतन रुपये १३०० व इतर वेतन भत्ते देण्यात येणार आहेत. मूळ कामगारांचे मुलगा, सून, नातू, पत्नी, भाचा, पुतण्या यांना वारसा हक्काने सफाई कामगारपदावर नेमणूक मिळाली आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त अरुण वानखेडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 12:04 am

Web Title: kdmc appointment 53 cleaning workers on special ground zws 70
Next Stories
1 जागेअभावी सेवारस्त्याला तिलांजली
2 ठाण्यात नवा खाडी पूल
3 थकीत देयक वसुलीसाठी ‘सवलत’
Just Now!
X