धूळ खात पडलेल्या बस चालवण्यासाठी ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती

नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून परिवहनच्या आगारात धूळखात पडलेल्या ६० बस विविध मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात यासाठी ३०० चालक आणि २०० वाहकांची कंत्राटी पद्धतीने भरतीदेखील करण्यात येणार आहे. याखेरीज उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या बसेसदेखील लगेच रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कल्याण, डोंबिवलीकरांना रिक्षासाठी सोसावी लागणारी फरफट थांबणार आहे.

शहरातील नागरिकांना दळणवळणाची उत्तम सुविधा देता यावी यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहनने जवाहरलाल नेहरू योजनेच्या माध्यमातून ६० बसगाडय़ा खरेदी केल्या आहेत. मात्र, वाहक-चालकांच्या अभावामुळे या बसगाडय़ा धूळ खात पडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी झालेल्या कल्याण-डोंबिवली परिवहन समितीच्या बैठकीत या बसगाडय़ा रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवहनच्या ताफ्यात अजून ११५ बसगाडय़ा दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या बसगाडय़ा आगाराबाहेर काढण्यासाठी तातडीने ठोक पगारी तत्त्वावर ४५० वाहक आणि चालकांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याविषयीचा प्रस्ताव मंजूर करून महापालिकेने तो राज्य सरकारला पाठविला; परंतु सरकारने वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी पदनिर्मितीचा प्रस्ताव फेटाळला. परिवहन उपक्रमाने कंत्राटी पद्धतीने भरती करावी. तसेच कोणतीही पदनिर्मिती करू नये, असे निर्देशही शासनाने दिले. शासनाच्या निर्देशामुळे परिवहन उपक्रमातील वाहक आणि चालक कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार असून लवकरच निविदा काढली जाणार असल्याचे परिवहन समितीचे सभापती भाऊ चौधरी यांनी दिली.

सद्य:स्थितीत जी.ए. डिजिटल वेब वर्ल्ड या कंत्राटदाराकडून व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा घेते. या ठेक्यांची मुदत जून महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येईल. ही ठेक्यास तीन महिन्यांची मुदतवाढ नुकतीच देण्यात आली. दरम्यान, नव्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी व्यवस्थापन नव्या एजन्सीची नेमणूकीसाठी निविदा काढण्यात आली आहे. सद्य:स्थितीत परिवहनच्या ताफ्यात एकूण ५५० वाहक-चालक आहेत. त्यात आता नव्याने ३०० चालक व २०० वाहकांची भरती करण्यात येणार असल्याने ६० बसगाडय़ा रस्त्यावर धावणार आहेत.