28 September 2020

News Flash

कल्याण, डोंबिवलीला ‘क्लस्टर’चे कवच?

ठाकुर्ली येथील धोकादायक इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षा व पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

| July 30, 2015 03:18 am

ठाकुर्ली येथील धोकादायक इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षा व पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली या पट्टय़ांतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे संकेत महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिले. या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली शहरांतही समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट) राबवली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक धोकादायक इमारती आहेत. काही दुर्घटना घडल्यानंतर या इमारतींचा विचार करण्यापेक्षा यासंबंधी कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार सुरू  आहे. याबाबत एक तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे,’ असे आयुक्त रवींद्रन यांनी बुधवारी सांगितले. महापालिका हद्दीतील धोकादायक इमारती, त्यांची ठिकाणे, तेथील रहिवासी यांची एकत्रित माहिती आपण घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाकुर्ली येथील मातृकृपा ही धोकादायक इमारत कोसळल्यामुळे २० कुटुंबे बेघर झाली आहेत. या कुटुंबीयांना पालिकेच्या कल्याण-डोंबिवलीतील संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. या कुटुंबीयांना पालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतही समूह पुनर्विकास योजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून याचे संकेत मिळू लागले असून या योजनेचा आराखडा तयार करण्याचे अधिकार महापालिकेस मिळावेत यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे शहरातील समूह विकास योजना न्यायालयीन फेऱ्यात सापडली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामांचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर राबविता येईल का, याचीही चाचपणी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 3:18 am

Web Title: kdmc commisnor hint cluster development for kalyan dombivli
Next Stories
1 बेकायदा चिंधी बाजाराला शिवसेनेचा आधार
2 उद्ध्वस्त संसार आणि नातलगांचा आक्रोश!
3 स्कायवॉकवरती तळे साचे!
Just Now!
X