‘‘महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद असेल तरच नगरसेवकांच्या विकासकामांच्या नस्ती (फाइल्स) मंजूर करायच्या. निधीची तरतूद नसताना रेटून विकासकामांच्या नस्ती मंजूर करून दायित्वाचे डोंगर वाढवायचे नाही,’’ अशा स्पष्ट सूचना आयुक्त मधुकर अर्दड यांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्याने महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हे परिपत्रक तातडीने रद्द करा, अशी आक्रमक मागणी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत आर्थिक शिस्तीचे तीनतेरा वाजले आहेत. अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नसताना कोटय़वधी रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याच्या तक्रारी असून यामुळे तिजोरीत खडखडाट झाला असल्याचे आरोप केले जाऊ लागले आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असताना प्रभागातील लहान-मोठी कामे मार्गी लागावीत यासाठी नगरसेवक कमालीचे आग्रही आहेत. प्रभागातील गटार, पायवाटा, उद्यान, रस्ते यांसारखी कामे मार्गी लावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना चालायला रस्ते नाहीत. ठेकेदारांकडून खड्डे खोदणे सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर एकत्रितरीत्या आवाज उठवण्याऐवजी नगरसेवक आपल्याच प्रभागापुरते कामे पूर्ण करण्यासाठी आग्रही असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. असे असताना आयुक्तांनी अर्थसंकल्पाचा हवाला देत कामे करताना आर्थिक नियोजन लक्षात घ्यायला हवे, असे स्पष्ट आदेश लेखा तसेच अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.  

* नगरसेवकांची कामे करताना प्रशासनातील कोणतीही आर्थिक शिस्त बिघडू नये म्हणून आयुक्त मधुकर अर्दड यांनी ११ अटी असलेले एक परिपत्रक काढले आहे.
* या ११ अटी पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांच्या विकास कामांच्या नस्ती तयार करायच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* पूर्वी केलेल्या कामाचा तपशील, मोजमापे, चाचणी तसेच तपशिलासह स्थळाचा नकाशा, संबंधित जागेचा गुगल नकाशा, दर पृथक्करण, निधीची तरतूद, बांधकाम साहित्य वाहतूक नकाशा असे सगळे तपासून कामे सुरू करा, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. 
* हे सर्व निकष पाळण्याचा आग्रह धरला तर कामे कशी होतील, असा सवाल आता काही नगरसेवक उपस्थित करू लागले असून यामुळे परिपत्रकाला विरोध करण्याची भूमिका घेण्यात येत आहे.
* शहरातील विकासाची कामे मार्गी लागणे महत्त्वाचे असल्याने स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली.