२५ सफाई कामगारांचे निलंबन

कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी आग्रही असलेले पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी आता पालिकेच्या व्यवस्थित कामकाजात अडसर ठरणाऱ्यांचीही ‘सफाई’ सुरू केली आहे. रवींद्रन यांनी बुधवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील ‘ब’ प्रभागातील गणेशघाट येथील हजेर शेडला भेट दिली. त्यांना २५ सफाई कामगार एकाच वेळी विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर या २५ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश रवींद्रन यांनी दिले. याशिवाय बेकायदा बांधकाम तोडण्यास टाळाटाळ करणारे प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत जाधव यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून रवींद्रन यांनी शहर स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी आयुक्त दररोज विविध प्रभागांना अचानक सकाळच्या वेळेत भेटी देतात. बुधवारी त्यांनी ब प्रभागात अचानक भेट दिली. त्या वेळी त्यांना २५ सफाई कामगार विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे या कामगारांचे मुख्य आरोग्य निरीक्षक प्रशांत पुरी यांच्यासह २५ जणांना निलंबित करण्यात आले.

सफाई कामगारांचे कारनामे
पालिकेच्या आस्थापनेत सुमारे २२०० सफाई कामगार मंजूर आहेत. प्रत्यक्षात १८०० सफाई कामगार कार्यरत आहेत. सुमारे चारशे ते पाचशे कामगार आजारी, विविध व्याधी जडल्याने कायमस्वरूपी गैरहजर आहेत. प्रत्यक्षात १००० ते १२०० सफाई कामगार नियमित सेवेत आहेत. मात्र त्यातही केवळ ९०० कामगार कामावर असतात.