कल्याणच्या आयुक्तांची गणेश मंडळांना तंबी; फौजदारी कारवाईचा इशारा

कल्याण : न्यायालय तसेच शासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत बिनधोकपणे उत्सव साजरे करण्यात पटाईत मानल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सव मंडळांना आयुक्त गोविंद बोडके यांनी तंबी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर तसेच परवानगी न घेता भर रस्त्यात मंडप उभारला तर संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोडके यांनी दिला आहे. याशिवाय मंडप उभारणीसाठी रस्ते खोदल्यास खड्डय़ांच्या संख्येनुसार प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, अशी तंबीही दिली आहे.

गणेशोत्सव काळात मंडप उभारणीसंदर्भात बोलावलेल्या पोलीस, वाहतूक, आरटीओ आणि गणेश मंडळांच्या एकत्रित बैठकीत आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेक गणेश मंडळ पालिकेच्या परवानगीसाठी अर्ज करून परवानगी मिळाल्याचे गृहीत धरून रस्त्यावर नियमबा मंडपउभारणीचे काम सुरू करतात, तेही सहन केले जाणार नाही, असे आयुक्तांनी या बैठकीत बजावले. उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत मंडपउभारणीची कामे व्हावीत, यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांची चार भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके मंडळाने नियमाच्या चौकटीत मंडप उभारणी केली आहे की नाही याची चाचपणी करतील. वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने कोणाही मंडळाने मंडप उभारणी करू नये, असे आयुक्तांनी सुचवले. मंडळाने पालिकेकडून घेतलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागात ठळक अक्षरात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडपाच्या बाहेर आणि रस्त्यावर अनेक गणेश मंडळे जाहिरातींचे फलक लावून परिसर विद्रूप करतात. अशा जाहिराती मंडळांनी लावल्यास त्यांना पालिकेच्या जाहिरात धोरणाप्रमाणे शुल्क पालिकेत भरावे लागेल.

गेल्या वर्षीची चूक यंदा नाही

गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने नियमबाह्य मंडप उभारणीवरून कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाचे कान उपटले होते. मागील वर्षी पालिका हद्दीत वाहतुकीला अडसर होईल, नियमबाह्य पद्धतीने सुमारे ३२ मंडप विविध रस्त्यांवर उभारण्यात आले होते. अशा मंडपांवर पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने पालिकेला या प्रकरणी खडसावले होते. बहुतांशी गणेशोत्सव मंडळे राजकीय आशीर्वादाने आपले उत्सव साजरे करतात. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची अशा मंडळांवर कारवाई करताना गोची होते. या वेळी मात्र आपल्या बेभान उत्सवाला मंडळांना आवर घालावी लागणार आहे, असा अप्रत्यक्ष इशारा आयुक्तांनी दिल्याची चर्चा आहे.

ऑनलाइन परवानग्या

गणेशोत्सव मंडळांना या वेळी ऑनलाइन परवानग्या देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या http://www.kdmc.gov.in  या संकेतस्थळावरून मंडळे आपले परवानगी अर्ज दाखल करू शकणार आहेत. एक खिडकी पद्धतीची सुविधा प्रभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या तीन आठवडय़ापूर्वी मंडळांनी पालिकेत अर्ज दाखल करण्यास सुरुवात करावी. ३ सप्टेंबरनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सोसायटीच्या आत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना अग्निशमन प्रतिबंधक, पोलीस परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. पालिकेत दाखल अर्ज वाहतूक, अग्निशमन, स्थानिक पोलिसांकडे पाठवून ना हरकत मिळाल्यानंतर मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात येणार आहे, असे आयुक्त बोडके यांनी स्पष्ट केले.