News Flash

लाचखोराला आयुक्तांचे पाठबळ

निलंबित लाचखोरांना सेवेत घेण्याचा परिपाठ आयुक्त ई. रवींद्रन यांनी सुरू ठेवल्याने नाराजी व्यक्त होत आहे

लाचखोराला आयुक्तांचे पाठबळ

 

निलंबित अधिकारी दीपक भोसले कल्याण-डोंबिवली पालिका सेवेत पुन्हा दाखल

कल्याण-डोंबिवली पालिकेतील लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेला निलंबित कार्यकारी अभियंता दीपक भोसले यांना आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशावरून शनिवारी पुन्हा पालिकेच्या सेवेते ‘गुप्तपणे’ हजर करून घेण्यात आले. या पुनर्नेमणुकीवरून गोंधळ नको, म्हणून शनिवारची वेळ निश्चित करण्यात आली. शनिवारी हजर करून घेतल्यानंतर रविवारी प्रशासनाला सुट्टी असल्याने भोसले यांची नियुक्ती कुणाच्या नजरेत येणार नाही, अशी व्यूहरचना होती. दरम्यान, निलंबित लाचखोरांना सेवेत घेण्याचा परिपाठ आयुक्त ई. रवींद्रन यांनी सुरू ठेवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सर्वच आयुक्तांच्या खास मर्जीतील व गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाणारे दीपक भोसले लाचखोरी प्रकरणात निलंबित झाल्याने अनेक ठेकेदार, मजूर संस्थाचालक, माहिती अधिकार कार्यकर्ते कमालीचे दु:खी झाले होते. या सर्वाचे ‘तारणहार’ म्हणून भोसले यांनी वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात यावे यासाठी काही बाह्य़शक्ती सतत प्रयत्नशील होत्या. गेल्या सात महिन्यांत दोन ते तीन वेळा भोसले यांना सेवेत घेण्याचा प्रयत्न झाला. पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. गेल्या दोन वर्षांत लाचखोर निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आयुक्त ई. रवींद्रन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. भोसले यांना सेवेत घेतले तर पुन्हा प्रशासनावर टीका सुरू होईल, या भीतीने भोसले यांची गुपचूप शहर अभियंता यांच्या कार्यालयात अकार्यकारीपदावर नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी रवींद्रन यांनी गणेश बोराडे या लाचखोराला सेवेत घेतले होते. ते पुन्हा लाचखोरीत अडकले. याशिवाय मद्यपार्टीतील अभियंते, वादग्रस्त अधिकाऱ्यांची आयुक्तांनी नेहमीच पाठराखण केली आहे. आयुक्तांच्या या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रकरण काय?

गेल्या वर्षी मार्चमध्ये कल्याणमधील पालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या दालनांची कामे एका ठेकेदाराने पूर्ण केली. या कामाचे देयक काढण्यात तत्कालीन निवृत्त व निलंबित अभियंता पाटीलबुवा उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले यांनी चालढकल केली. ‘लक्ष्मीदर्शना’मुळे आपले काम अडविण्यात येत असल्याची, खात्री झाल्यानंतर ठेकेदाराने उगले यांना कार्यालयात व दीपक भोसले यांच्या त्यांच्या राहत्या घरात जाऊन पैसे दिले. या दोघांच्या या पैसे स्वीकारण्याच्या हालचाली एका गुप्त कॅमेऱ्याने कैद केल्या. या प्रकरणाची शासनाकडे तक्रार झाली. नगरविकास विभागाने पालिकेला या लाचखोरी प्रकरणाबाबत विचारणा केल्यावर हे लाचखोरीचे प्रकरण उघडकीला आले. त्यानंतर या प्रकरणाची जलअभियंता अशोक बैले समितीने चौकशी करून या प्रकरणात तथ्य असल्याचा व एसीबीकडे हे प्रकरण देऊन उचित कार्यवाही करण्याचे प्रशासनाला सुचविले होते.

निलंबित अभियंता दीपक भोसले यांची चौकशी सुरू असताना, त्यांना पालिकेने सेवेत दाखल करून घेतले असेल तर या प्रकरणाची तातडीने पालिका प्रशासनाकडून माहिती घेण्यात येईल. त्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही होईल.

– संग्रामसिंग निशाणदार, पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे

भोसले यांची अद्याप ‘एसीबी’तर्फे चौकशी सुरू आहे. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय भोसले यांची विभागीय चौकशी करता येत नाही. तसेच, याप्रकरणी गुन्हा दाखल नाही. त्यात भोसले यांच्या निलंबनाला सहा महिने होऊन गेले आहेत. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना सेवेत घ्यावे लागले.

– दीपक पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन, कडोंमपा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 1:35 am

Web Title: kdmc corrupt officer kdmc commissioner kalyan dombivli municipal corporation
Next Stories
1 कर भरण्यास मुदतवाढ दिल्याने पेट्रोलपंप बंद मागे
2 एका मतदाराला चार मताधिकार
3 ‘ठाणे’दार कोण होणार?
Just Now!
X