२७ कोटींच्या प्रस्तावाची पालिकेची तयारी

कल्याण-डोंबिवली शहरातील कचऱ्याची न्यायालयीन आदेशानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२ ठिकाणी बायोगॅस आणि कचऱ्यापासून खत प्रकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल दोन हजार कचरा वेचक महिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २७ कोटी रुपयांची वार्षिक तरतूद करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

महापालिका हद्दीत १२ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात येणार असून यासंबंधीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आयरे गाव येथील हा प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे लागणार आहे. हे काम सफाई कामगार किंवा महापालिकेला कामगार नेमून करणे शक्य होणार नाही. कचऱ्यामधील ओला, सुका कचरा, प्लॅस्टिक वेगळे करण्याचे काम कचरा वेचक महिलांना दिले तर त्यांना रोजगाराचे साधन तयार होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. महापालिका हद्दीतील अनेक कचरा वेचक महिलांना पालिकेने ओळखपत्रे दिली आहेत. या महिला काही भागात ओला, सुका कचरा वेगळा करण्याची कामे करतात. या महिलांचे प्रमाण कमी आहे. पालिका हद्दीत एकूण दोन हजार कचरा वेचक महिला आहेत. त्यांना या कचरा विलगीकरणाच्या कामात सहभागी करून घेण्याचा प्रशासन विचार करीत आहे. एकाच वेळी, एकाच दिवशी दररोज दोन हजार महिला ओला, सुका कचरा विलग करू लागल्या तर सुमारे ४० ते ५० टक्के कचरा बायोगॅस प्रकल्प किंवा कचराभूमीवर नेण्यापूर्वीच वेगळा झालेला असेल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेचे कचऱ्याबाबत जे आदेश निघतील त्याचे पालन रहिवाशांनी करायला हवे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण घराघरातून झाल्याने मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

– विलास जोशी, साहाय्यक आरोग्य अधिकारी कडोंमपा