‘गडकरी’जवळील जागेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चालढकल

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : गडकरी रंगायतन नाटय़गृहाशेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर मोठे वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पालिकेच्या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने हा प्रकल्प अधांतरी आहे. काही वर्षांपूर्वीदेखील महापालिकेने या जागेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला होता. तेव्हाही प्राधिकरणाने नकार दिला होता.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. तुलनेने वाहनतळाची सुविधा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अनेकजण रस्त्यावरच वाहने उभी करीत असून अशा बेकायदा पार्किंगमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागांचा शोध घेऊन त्या ठिकाणी वाहनतळ उभारणीचे प्रस्तावही तयार केले होते. अशाच प्रकारे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या गडकरी रंगायतनजवळ वाहनतळ उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या वाहनतळामुळे मासुंदा तलाव, जांभळी नाका, टेंभीनाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असा दावा पालिकेने केला होता.

गडकरी रंगायतन नाटय़गृहाशेजारीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा १९५२.८० चौरस मीटरचा भूखंड आहे. त्यापैकी २९८ चौरस मीटरवर कार्यालय तर ५१० चौरस मीटरवर निवासस्थाने आहेत. या भूखंडावर वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव पालिकेने काही वर्षांपूर्वी तयार केला होता. परंतु कार्यालय आणि निवासस्थाने असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा भूखंड देण्यास नकार दिला होता. त्यावर पालिका प्रशासनाने तोडगा काढत या जागेच्या मोबदल्यात कार्यालय आणि निवासस्थाने शहरात इतरत्र स्थलांतर करण्यासाठी समकक्ष बांधीव क्षेत्र उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवून त्यासंबंधीचा नवा प्रस्ताव तयार केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ३ डिसेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जागा हस्तांतरणासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला. मात्र, त्यावर अद्याप प्राधिकरणाकडून काहीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपचा आग्रह

ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मासुंदा तलावाकाठी अनेकजण फेरफटका मारण्यासाठी येतात. येथे वाहने उभे करण्यासाठी जागा नसल्याने अनेकजण रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यातच येथे घोडागाडीची वाहतूक सुरू असते. यामुळे गडकरी रंगायतन चौक, जांभळी नाका या परिसरात मोठी वाहतूककोंडी होते. त्याचा फटका टेंभीनाक्यावरील वाहतुकीलाही बसतो. नवीन वाहनतळ उभे राहिल्यास ही समस्या सुटणार असून या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. त्यावेळेस या प्रस्तावाबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आयुक्त डॉ. शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रस्तावाबाबत संबंधित विभागाकडे आम्हीसुद्धा पाठपुरावा करणार असून त्यासाठी संबंधित विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आमदार केळकर यांनी दिली.