डोंबिवली पूर्व भागातील पाथर्ली चौक ते मंजुनाथ शाळेच्या दरम्यान रस्ता अडवून अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या हॉटेल्सवर पालिकेच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. या भागातील टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई थांबवावी म्हणून मालक राजकीय दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याला कोणीही दाद दिली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून ही हॉटेल्स तोडावीत म्हणून पालिकेकडून प्रयत्न सुरू होते, पण राजकीय दबावतंत्रामुळे या हॉटेल्सवरील कारवाईत अडथळे येत होते. या हॉटेल्सचा या भागात उभ्या राहणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला अडथळा येत आहे. त्यामुळे ही हॉटेल्स तोडणे आवश्यक होते. गेल्या महिन्यात ही हॉटेल्स तोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.
नगरसेविकेच्या हॉटेलवर कारवाई
या कारवाईत अडथळा आणला तर राजकीय पदे धोक्यात येतील, त्यामुळे ही कारवाई थांबवावी म्हणून कोणीही नगरसेवक, राजकीय नेत्याने पुढाकार घेतला नसल्याचे समजते. मनसेच्या नगरसेविकेच्या पतीचे हे हॉटेल आहे. पाथर्ली चौक भागातील पदपथावर असलेली भंगार फर्निचर दुकाने हटविण्याचे आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांनी फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत आणि अनेक वर्षे वाहतूक कोंडीत अडथळा ठरणारा, पदपथ अडवून ठेवलेला हा भाग मुक्त करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.