कल्याण शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा चौक ते टाटा नाका या चार ते पाच किलोमीटरच्या पट्टय़ातील रस्त्याच्या दुतर्फाची बांधकामे पाडताना कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांनी फक्त पत्र्याच्या टपऱ्या तोडल्या आणि दुकानाच्या फक्त पाटय़ा काढण्यात धन्यता मानली. त्याचा पुरेपूर लाभ उठवत आता वीस दिवसांनंतर त्याच तोडलेल्या जागांवर व्यावसायिकांनी बांधकामे सुरू केले आहेत. म्हणजे शिळफाटा रस्ता पुन्हा व्यावसायिकांच्या ताब्यात गेला आहे.

कल्याण शिळफाटा रस्ता हा वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू आहे. येणाऱ्या काळात या रस्त्यावरील वाहतूक व वाहन संख्या कित्येक पटीने वाढणार आहे. आताच्याच वाहन संख्येने शिळफाटा रस्ता गुदमरायला लागला आहे. या गुदमरण्यात वाहनचालक, प्रवासी नाहक होरपळत आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा असणारी बेकायदा हॉटेल्स, ढाबे, फर्निचर दुकाने, वर्कशॉप, दुतर्फा रस्ता दाबून उभारण्यात आलेले दुमजली बेकायदा गाळे यामुळे या रस्त्याची निमुळती अवस्था आहे. रस्त्यावरची ही कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आक्रमक पाऊल उचलून ठाणे पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्यापर्यंतची (लोढा पलावा) दुतर्फा असणारी बेकायदा बांधकामे गेल्या महिन्यात जमीनदोस्त केली. जयस्वाल यांना ही कारवाई करताना कोणी हॉटेल, जमीन मालक आडवा आला नाही, कारण ही जमीनच मुळी सरकारी मालकीची आहे. शिळफाटय़ाचा लोढा पलावापासून ते पत्रीपुलापर्यंतचा पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असणारी बेकायदा बांधकामे ठाणे पालिकेप्रमाणे तोडण्याची मोठी संधी कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांना उपलब्ध झाली होती. मात्र कल्याण डोंबिवली पालिकेने ती गमावली. या रस्त्यावर काही ठिकाणी ‘पाटीलकी’ असणाऱ्या गोळवली, सोनारपाडा, मानपाडा, काटई आणि लोढा पलावा चौकातील बेकायदा बांधकामांकडे ढुंकूनही पाहण्याची हिम्मत अधिकाऱ्यांनी केली नाही. या बेकायदा नगरीला पाठीशी घालण्यासाठी फक्त नोटीसा, सुनावण्या असा फार्स उरकण्यात येत आहे. कडोंमपाच्या या नाकर्तेपणामुळे शिळफाटा रस्त्याच्या गळा बेकायदा बांधकामांनी घोटलेलाच राहणार आहे.

ठाणे पालिकेने शिळफाटा रस्त्यावरील तोडकामाची कारवाई केल्यानंतर तातडीने तेथील मलबा उचलला. रस्ता दोन्ही बाजूने साफ करून तेथे गटारांची कामे करून घेतली. पुन्हा या रस्त्यावर टपऱ्या, हॉटेल्स उभी राहू नयेत म्हणून सिमेंटचे खांब टाकून तारेचे कुंपण घातले. अतिशय दूरदर्शी पद्धतीने या रस्त्याचे संरक्षण करण्यासाठी ठाणे पालिकेने पाऊल उचलली असताना, कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन मात्र अवाढव्य बांधकामे तोडण्याचे सोडाच, पण गेल्या वीस दिवसांनंतर तोडलेल्या कारवाईचा साधा मलबाही उचलू शकली नाही.

रायगड आणि नाशिक जिल्ह्य़ांना जोडणारा, ठाणे, मुंबईतील टोल चुकविण्यासाठी वाहन चालकांचा मधला मार्ग म्हणजे कल्याण-शिळफाटा रस्ता. या बाहेरच्या वाहनांबरोबर कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरांतील वाहनचालक मुंबई, नवी मुंबई, पनवेलकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतो. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे.

बार, हॉटेल्स ‘जैसे थे’ 

शिळफाटा आणि वाहतूक कोंडी हे आता दररोजचे समीकरण झाले आहे. रस्त्यावर अतिक्रमण केलेली बेकायदे बांधकामे हे त्याचे मुख्य कारण आहे. मात्र त्यावर कारवाई करण्याचे धाडस कुणीही दाखविलेले आहे. कडोंमपाच्या अधिकाऱ्यांनी दुकानांच्यावर किरकोळ नामफलकाच्या पाटय़ा काढणे, टपऱ्या, पत्रे तोडणे याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली नाही. टाटा नाकाजवळील गोळवली बाजारातील टपऱ्या, हातगाडय़ा पुन्हा रस्त्यावर लागल्या आहेत. गोळवलीजवळील एका वजनदार पाटलाच्या घराच्या आसपासच्या एकाही हॉटेल, दुकान बांधकामाला हात लावण्यात आलेला नाही. मानपाडा येथील पेट्रोलपंप, मानपाडेश्वर मंदिरासमोरील टपऱ्या, दुकाने जशीच्या तशी उभी आहेत. काटईत प्रवेश करताना वैभवनगरी ते निळजे उड्डाण पुलादरम्यानची टोलेजंग बांधकामे ताठ मानेने उभी आहेत. लोढा पलावा चौकातील लक्ष्मीकृपा हॉटेल, एक मद्य विक्रीचे दुकान आजही तेवढय़ाच जोमाने सुरू आहे. ही दुकाने, त्या पुढील रिक्षा, खरेदीदारांच्या गाडय़ा पाहता ही दुकाने लोढा चौकातील वाहतूक कोंडीला सर्वाधिक जबाबदार आहेत. प्रत्येकाला उपजीविकेसाठी व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हा व्यवसाय दररोज लोकांच्या मुळावर उठत असेल. तर त्याच्यावर कारवाई करणे हे प्रशासकीय यंत्रणेचे काम आहे. शिळफाटय़ावरील बेकायदा बांधकामे, तेथील व्यवसाय यावर एक मोठी प्रशासकीय साखळी चैन करीत आहे. त्यामुळे त्यांना ही कारवाई नकोच आहे. त्याची पुरेपूर अंमलबजावणी कल्याण-डोंबिवली पालिकेने केली. ठाण्याचे आयुक्त जयस्वाल यांची तुलना करता कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त ई. रवींद्रन कारवाईत कमी पडले, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.

ठोस कारवाई अपेक्षित

येत्या काळात शिळफाटा रस्त्यावरून उन्नत मार्ग (इलेव्हेटेड) जाणार आहे. या मार्गासाठी आणखी जमीन लागणार आहे. शिळफाटा रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूला तीस-तीस मीटर आणि कल्याणहून शिळकडे जाताना सेवा रस्त्यासाठी अतिरिक्त तीस मीटर जागा सेवा रस्त्यासाठी लागणार आहे. ठाणे पालिकेने शिळफाटा रस्त्यालगत काही विकासकांना बांधकाम परवानगी देताना या नियमांचा आधार घेऊन बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. कल्याण पालिकेने हा सामासिक अंतर विचारात घेतलेला नाही. सामासिक अंतराच्या गोंधळाचा लाभ उठवत व्यावसायिकांनी पाडकामाला विरोध करण्यात बाजी मारली. नाहूर ते काटई नाका, माणकोली उड्डाणपूल, बदलापूर ते फळेगाव, नाशिक महामार्ग, शिळफाटा दत्तमंदिर ते भोपर-भिवंडी रस्ते येणाऱ्या काळात सुरू होणार आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्याचे महत्त्व, त्याच्या आजूबाजूच्या जागेचे मोल तेवढेच वाढणार आहे. या रस्त्याच्या सामासिक अंतरात असलेल्या जमिनी जर भूमिपूत्र, समाजकंटक, दादा, भाईंनी बळकावून त्यावर टोलेजंग इमले उभारले तर येणाऱ्या काळात आक्रसलेल्या शिळफाटा रस्ते विकासात मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, ठाणे, अलिबाग भाग परिसरातील रस्त्यांवर येत्या वीस वर्षांत चाळीस ते पन्नास लाख वाहनांची भर पडणार आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे. त्याचा काही भार शिळफाटा रस्त्यावर पडणार आहे. त्यादृष्टीने शिळफाटा रस्त्यावरील अतिक्रमणांवर ठोस कारवाई अपेक्षित आहे.

ढाबा संस्कृती

अवजड वाहनचालक अनेक वेळा रात्रीच्या वेळेत शिळफाटा रस्त्याच्या कोपऱ्यावर वाहने थांबवून, आपला स्टोव्ह, पातेली काढून भोजनासाठी रात्रीचा मुक्काम एखाद्या झाडाखाली करीत असत. तसे काही स्थानिक उद्योगी (भूमिपूत्र) मंडळींनी दुफाकी प्लास्टिक कापड टाकून या रस्त्याच्या दुतर्फा पंजाबी, शेर ए पंजाब, कोकणचा राजा  असे अनेक ढाबे सुरू केले. आता तर हा रस्ता मार्केट आहे का, असा प्रश्न पडतो.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास