कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उपअभियंता दत्तात्रय मस्तुद यांनी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली. सोमवारी रात्री १२ ते एकच्या सुमारास हा प्रकार घडला. मस्तुद यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आजारपणाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज खडकपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेच्या वेळी मस्तुद यांची पत्नी व मुलगा हे दोघेही घरात होते. मस्तूद गेले काही दिवस कर्करोगाने आजारी होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मृत्युपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली नसल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक व तपासअधिकारी एच. वाघमारे यांनी दिली. मस्तुद यांच्या मुलाने नोंदविलेल्या माहितीनुसार मस्तुद यांना घशाचा कर्करोग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसेच ते सतत नोकरीच्या चिंतेत रहात असत.
२०१४ मध्ये अनधिकृत बांधकामाला अभय दिल्याप्रकरणी माजी नगरसेवक विद्याधर भोईर, शिपाई विलास कडू यांच्यासह पालिकेचे उपअभियंता असलेले मस्तूद यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने चार लाख रुपयांची लाच घेताना पकडले होते. मस्तूद यांच्या नावे सात खोल्या असल्याचेही अन्वेशन विभागाला आढळून आले होते. याप्रकरणी पालिकेने मस्तूद यांना निलंबीत केले होते.