कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेले चार महिने टाळेबंदीच्या काळात नोकरदार, रहिवाशांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून यामुळेच नागरिकांना कर भरण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

३१ जुलैअखेपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना करात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र टाळेबंदीत आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे अनेकांनी करभरणा मुदत वाढविण्याची मागणी प्रशासनाकडे केली. भाजपचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते राहुल दामले यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून करभरणा मुदत वाढविण्याची मागणी केली होती. मालमत्ता कर पालिका उत्पन्नाचा मुख्य महसुली स्रोत आहे. पण टाळेबंदीच्या काळात करवसुलीवर परिणाम झाला आहे. मुदत वाढविली तर रहिवाशांना कर भरण्यासाठी वेळ मिळेल. तसेच अधिक कर पालिका तिजोरीत जमा होईल, असे दामले यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले होते. या पार्श्वभूमीवर कर निर्धारक विभागाने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी करभरणा वाढीस मुदत देण्याचा निर्णय घेतला.